(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mucormycosis |‘म्युकरमायकोसिस’च्या औषधोपचारासाठी 30 कोटींचा निधी उपलब्ध, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
‘म्युकरमायकोसिस’च्या औषधोपचारासाठी 30 कोटींचा निधी उपलब्ध करुन दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.‘म्युकरमायकोसिस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश : उपमुख्यमंत्री
पुणे : कोरोनानंतर आता 'म्युकरमायकोसिस’ या बुरशीजन्य आजाराने डोकं वर काढलं आहे. या आजारावर उपचारांचा खर्चही खूप होत असून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. या पार्श्वभूमीवर ‘म्युकरमायकोसिस’चा अंतर्भाव महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत करण्यात आला असून त्यासाठी आवश्यक 30 कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात राज्यातील कोरोना परिस्थितीसह प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (व्हीसीद्वारे), अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (व्हीसीद्वारे), मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने उपाययोजनांसाठी तातडीने पावले उचलावीत. या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा अधिकचा धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे लहान मुलांच्या सुरक्षेसाठी, उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारावी. यामध्ये लहान मुलांचे व्हेंटिलेटर तसेच त्यांच्यासाठी लागणारी औषधे, इतर उपचारांसाठीची सामुग्री उपलब्ध करावी. तिसरी लाट येण्यापूर्वी ही व्यवस्था यथाशिघ्र उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
राज्यासाठी 25 हजार मेट्रीक टन मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा वाढविण्यासाठी आंतरराष्ट्रीयस्तरावर निविदा काढण्यात येत आहे. ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी हवेतून ऑक्सिजननिर्मिती करणाऱ्या ‘पीएसए’ प्लॅन्टची निर्मिती प्रत्येक जिल्ह्यात करण्यात येत आहे. राज्यात 36 जिल्ह्यांमध्ये 301 प्लॅन्ट उभारण्याची प्रक्रीया सुरु आहे. त्यापैकी 38 प्लॅन्ट कार्यरत आहेत. या 38 प्लॅन्टमधून 51 मेट्रीक टन ऑक्सीजनचा पुरवठा होत आहे. राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयात व जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘पीएसए’ प्लॅन्ट उभारण्यात येत आहेत. 240 प्लॅन्ट उभारण्यासाठीची वर्क ऑर्डर देण्यात आली असून त्याची प्रक्रीया सुरु आहे. येत्या काही काळात सर्व प्लॅन्टचद्वारे राज्यात एकूण सुमारे 400 मेट्रीक टन प्रतिदिन ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. या ऑक्सिजनद्वारे 19 हजारपेक्षा अधिक ऑक्सिजन बेडची गरज पुर्ण होईल.