"आम्ही टॉयलेट साफ करण्यासाठी नाही" वक्तव्यावरून साध्वी प्रज्ञासिंह यांना भाजपने फटकारलं
प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांना टार्गेट केलं. एकीकडे मोदी सरकार 'स्वच्छ भारत अभियाना'ला प्रोत्साहन देत असताना भाजपच्याच खासदाराचं हे वक्तव्य सर्वांच्या भुवया उंचावणारं आहे.
नवी दिल्ली : भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या स्वच्छतागृहं आणि गटारं साफ करण्याच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन भाजपने त्यांना फटकारलं आहे. प्रज्ञासिंह यांना दिल्लीतील भाजप मुख्यालयात बोलावून कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांनी झापलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'स्वच्छता अभियान' मोहिमेविरोधातील हे वक्तव्य असल्याचं मानलं जात आहे. भाजपच्या विचारधारेविरुद्ध वक्तव्य केल्याचं प्रज्ञासिंह यांना सांगण्यात आलं आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी विचार करुन बोलावं. तुमच्या एखाद्या वक्तव्यामुळे पक्षाची प्रतिमा खराब होते, असंही त्यांना बजावण्यात आलं आहे.
काय म्हणाल्या होत्या प्रज्ञासिंह ठाकूर?
मध्य प्रदेशातील भोपाळमधून भाजपच्या तिकीटावर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर खासदारपदी निवडून आल्या आहेत. सिहोर परिसरातील अस्वच्छतेबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. याला उत्तर देताना 'माझ्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडेन, पण टॉयलेट साफ करणं हे माझं काम नाही' असं साध्वींनी म्हटलं.
'आम्ही गटारं साफ करण्यासाठी नाही आहोत. ठीक आहे ना? आम्ही तुमचं शौचालय स्वच्छ करण्यासाठी अजिबातच नाही निवडून आलो. आम्ही जे काम करण्यासाठी निवडलो गेलो आहोत, ते काम आम्ही इमानदारीने करु. असं आम्ही पूर्वीही म्हणत होतो. आजही त्यावर ठाम आहोत आणि उद्याही आमचं म्हणणं तेच असेल' असं साध्वी प्रज्ञासिंह म्हणाल्या.
प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांना टार्गेट केलं. एकीकडे मोदी सरकार 'स्वच्छ भारत अभियाना'ला प्रोत्साहन देत असताना भाजपच्याच खासदाराचं हे वक्तव्य सर्वांच्या भुवया उंचावणारं आहे. सिहोर परिसरातील अस्वच्छतेबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. याला उत्तर देताना 'माझ्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडेन, पण टॉयलेट साफ करणं हे माझं काम नाही' असं साध्वींनी म्हटलं.
नथुराम गोडसे देशभक्त होता : प्रज्ञासिंह ठाकूर नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि राहील. त्याला दहशतवादी म्हणवणाऱ्यांनी आधी अंतरंगात डोकावून पाहावं. अशा लोकांना निवडणुकीत योग्य उत्तर मिळेल', असं वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान केलं होतं.
मक्कल निधी मय्यम पक्षाचे संस्थापक आणि अभिनेते कमल हासन यांनी नथुराम गोडसेबाबत केलेल्या वक्तव्याला प्रज्ञासिंह यंनी प्रत्युत्तर दिलं होते. गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता. त्यानंतरच देशात दहशतवादाची सुरुवात झाल्याचं हासन म्हणाले होते. यावर साध्वी प्रज्ञा सिंह यांची प्रतिक्रिया आली होती.
हेमंत करकरेंबद्दलही वादग्रस्त वक्तव्य 'शहीद हेमंत करकरेंना मी शाप दिला होता, म्हणून त्यांचा दहशतवादी हल्ल्यात सर्वनाश झाला', असं विधान प्रज्ञासिंह यांनी केलं होतं. या वक्तव्यावर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आल्यानंतर साध्वी प्रज्ञासिंह यांनी माफी मागितली होती.
आणखी वाचा
- साध्वी प्रज्ञाला माफ करु शकणार नाही, नरेंद्र मोदींची नाराजी
- गोडसेने गांधीजींच्या शरीराची, प्रज्ञाने आत्म्याची हत्या केली, कैलास सत्यार्थींचा संताप
- नथुराम गोडसे देशभक्त, साध्वी प्रज्ञाच्या वक्तव्याने पुन्हा वाद
- नथुराम गोडसेबद्दलच्या विधानावरुन वाद, साध्वी प्रज्ञा सिंहचा माफीनामा
- महात्मा गांधी पाकिस्तानचे राष्ट्रपिता, भाजप प्रवक्त्याचं वादग्रस्त वक्तव्य