BJP On Ram Mandir : दोन महिने बुथ पातळीवर प्रचार मोहीम, माहिती पुस्तिकांचे वितरण; राम मंदिराच्या मुद्यावर भाजपची रणनीति तयार
BJP On Ram Mandir Lok Sabha Election : एका बाजूला विरोधकांकडून सरकारची धोरणे, महागाई, बेरोजगारी आदी मुद्यांवर सत्ताधारी भाजपला घेरण्याची तयारी सुरू आहे. तर, दुसरीकडे भाजपकडून राम मंदिराचा मुद्दा ठळकपणे मांडण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे.
BJP Lok Sabha 2024 Ram Mandir : काही दिवसांत पार पडणाऱ्या राम मंदिर (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यासाठी भाजपने (BJP) जोर लावण्यास सुरुवात केली आहे. मात्र, हा सोहळा दोन महिने लोकांमध्ये चर्चेत ठेवण्यासाठी भाजपने नियोजन केल्याची माहिती सूत्रांनी केली आहे. भाजप कार्यकर्त्यांना 22 जानेवारीला दिवाळीसारखे वातावरण निर्माण करण्यास सांगितले आहे. तर, मार्च अखेरपर्यंत या मुद्यावर लोकांमध्ये भाजप जाणार असल्याची माहिती आहे.
एका बाजूला विरोधकांकडून सरकारची धोरणे, महागाई, बेरोजगारी आदी मुद्यांवर सत्ताधारी भाजपला घेरण्याची तयारी सुरू आहे. तर, दुसरीकडे भाजपकडून राम मंदिराचा मुद्दा ठळकपणे मांडण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. सूत्रांनी 'एबीपी न्यूज'ला दिलेल्या माहितीनुसार, 25 जानेवारी ते 25 मार्च या कालावधीत भाजप नेते आणि कार्यकर्ते देशातील विविध राज्यांमधून राम मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या लोकांना सुविधा पुरवतील. या अंतर्गत राम मंदिरात येणाऱ्या लोकांसाठी ढोल वाजवून, फूले उधळून त्यांना अयोध्येला मंदिर दर्शनासाठी पाठवण्यात येणार आहे.
दिल्लीतील भाजपच्या बैठकीत सहभागी झालेल्या नेत्यांना राम मंदिरासंदर्भातील आंदोलनाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यास सांगण्यात आले आहे. या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, सरचिटणीस सुनील बन्सल, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, मनसुख मांडविया आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
एका दिवसात अनेक भाविकांच्या दर्शनाची सोय
भाजप प्रत्येक बूथ स्तरावरून राम मंदिराचे दर्शन देणार आहे. ही मोहीम 25 जानेवारी ते 25 मार्च या कालावधीत चालणार आहे. एका दिवसात जवळपास 50 हजार लोकांना राम मंदिराचे दर्शन घडवण्याचे नियोजन भाजपने आखले आहे.
भाजप काय सांगणार?
राम मंदिराचे स्वप्न साकार करण्यात पक्षाचे योगदान किती आहे हे भाजप घराघरात सांगणार आहे. राम मंदिराच्या उभारणीला सातत्याने विरोध करणारे राजकीय पक्ष आणि नेते कोणते होते, हे देखील भाजपचे कार्यकर्ते सांगणार आहेत. लोकसभा निवडणुकीपर्यंत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा संदेश देशभरातील जनतेपर्यंत पोहोचवावा, अशी पक्षाची इच्छा आहे. पक्ष त्यासाठी पुस्तिकाही छापणार असल्याचे म्हटले जात आहे.
काय म्हणाले जेपी नड्डा?
बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटले की, राम मंदिराचे प्रत्येकाने चांगले दर्शन घेतले पाहिजे. या काळात कोणत्याही प्रकारचा भेदभाव होता कामा नये, याची काळजी घ्यावी असेही निर्देश त्यांनी दिले.