(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरु, आगामी निवडणुका आणि सरकारच्या कामगिरीवर मंथन
BJP Meeting: तब्बल दोन वर्षांच्या कालखंडानंतर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक सुरु झाली आहे. कोरोना संकटामुळे पहिल्यांदाच ही बैठक हायब्रीड पद्धतीने होत आहे.
BJP Meeting: तब्बल दोन वर्षांच्या कालखंडानंतर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक सुरु झाली आहे. कोरोना संकटामुळे पहिल्यांदाच ही बैठक हायब्रीड पद्धतीने होत आहे. काही सदस्य दिल्लीत थेट तर काही आपल्या राज्यातून व्हर्च्युअल पद्धतीने या बैठकीत सहभागी होणार आहेत. 124 सदस्य दिल्लीत तर 360 वर्चुअल पद्धतीने असतील.पाच राज्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय कार्यकारणीची बैठक उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारीसाठी ही अत्यंत महत्त्वाची बैठक असणार आहे. या निवडणुकांच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा आजच्या बैठकीत होणार आहे. सोबतच केंद्र सरकारच्या कामगिरीबाबत देखील मंथन होणार आहे. देशात शंभर कोटी डोस पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांच्या सत्काराचा राजकीय ठराव या बैठकीत संमत होऊ शकतो.
या बैठकीसाठी महाराष्ट्रातून विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुनील देवधर हे राष्ट्रीय पदाधिकारी थेट पद्धतीने सहभागी झाले आहेत. तर देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ आणि इतर कार्यकारिणी सदस्य व्हर्च्युअल पद्धतीने राज्यातूनच सहभागी झाले आहेत.. दुपारी तीन वाजेपर्यंत ही बैठक चालण्याची शक्यता त्यानंतर पंतप्रधानांच्या संबोधनाने बैठकीचा समारोप होईल.
या बैठकीत आगामी निवडणुकांच्या नियोजनावर चर्चा होणार आहे. सोबतच नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुकीतील यश-अपयशावर देखील मंथन देखील या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी हे कार्यकारिणीला संबोधित करणार आहेत.
या बैठकीसाठी भाजपचे राज्यातील नेते वसंत स्मृती दादर येथील कार्यालयातून ऑनलाईन हजेरी लावली आहे.यामध्ये विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चित्रा वाघ यासह अन्य नेते उपस्थित आहेत.