BJP Manifesto TN Election 2021 : तामिळनाडू निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा; दारुबंदीसह मोफत पिण्याचं पाणी देण्याचं आश्वासन
BJP Manifesto TN Election 2021 : 6 एप्रिल रोजी तामिळनाडूच्या सर्व जागांवर 234 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. अशातच या निवडणुकीसाठी भाजपनं आपला जाहीरनामा जाहीर केला आहे. या जाहीरनाम्यात भाजपनं जनतेला दारुबंदीसह मोफत पिण्याचं पाणी देण्याचं आश्वासन दिलं आहे.
चेन्नई : तमिळनाडू विधानसभा निवडणुकींसाठी भाजपने आपला जाहीरनामा सादर केला आहे. भाजपने आपल्या जाहीरनाम्यातून राज्यात दारुबंदी करण्याचं वचन दिलं आहे. त्याचसोबत पक्षाने शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छिमारांसाठीही वर्षकाठी 6 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे.
भाजपने राज्यात 50 लाख नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचंही वचन या जाहीरनाम्यात दिलं आहे. पक्षाचा जाहीरनामा सादर करताना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि वीके सिंह यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केलेला भाजपच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे :
- टू व्हिलर ड्रायव्हिंग लायसन्स 18 ते 23 वर्ष वयाच्या मुलींना फ्री देण्यात येणार आहे
- आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी फ्री टॅबलेट देण्यात येणार आहे.
- वेगळा कृषी अर्थसंकल्प सादर करणार
- घराघरांत राशन पोहोचवण्यात येईल.
- सरकार सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये मल्टी स्पेशालिटी रुग्णालयं उभारणार आणि सर्व उपचार मोफत करणार
- जल जीवन मिशन अंतर्गत 2022 पर्यंत सर्व घराघरांत मोफत पिण्याचं पाणी पोहोचवण्यात येईल
- राज्यात वाळू उत्खननावर पाच वर्षांसाठी बंदी असेल.
- चेन्नई कॉर्पोरेशनचे दिल्लीसारख्या तीन कॉर्पोरेशनमध्ये विभागले जाईल
तामिळनाडूच्या सर्व जागांवर 234 जागांसाठी 6 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर दोन मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येईल. या निवडणुकीमध्ये भाजपने सत्ताधारी एआयएडीएमकेसोबत युती केली आहे. भाजप 20 जागांवर निवडणूक लढवणार आहे.
एआयएडीएमके आणि भाजप यांच्या युतीची स्पर्धा मुख्यतः डीएमके-कांग्रेस यांच्या युतीशी होणार आहे. दरम्यान, 2016च्या विधानसभा निवडणुकांमध्ये एआयएडीएमकेने 135 जागांवर विजय मिळवला होता. तर डीएमकेने 88 आणि काँग्रेसने आठ जागांवर विजय मिळवला होता. भाजपने 188 जागांवर निवडणूक लढवली होती, परंतु, भाजपला एकाही जागेवर विजय मिळाला नव्हता.
दरम्यान, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरी येथे विधानसभा निवडणुका होणार आहेत. तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरी येथे एका टप्प्यात 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. बंगालमध्ये आठ टप्प्यात निवडणुका घेण्यात येणार आहेत. आसाममध्ये तीन टप्प्यात मतदान होणार असून पाच राज्यांचा निकाल 2 मे रोजी जाहीर होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :