BJP Loksabha Candidates: चंद्रकांत पाटील नवसारीतून, शिवराजसिंह चौहान विदिशातून, भाजपच्या पहिल्या यादीत बड्या नावांचा समावेश!
Loksabha Election 2024: लोकसभेचा उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपकडून सर्व इच्छूक नेत्यांची खोलवर जाऊन चौकशी करण्यात आली होती. संबंधित लोकसभा मतदारसंघात भाजपच्या नेत्यांना पाठवून तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला होता. पहिल्या उमेदवारी यादीत 195 उमेदवारांचा समावेश.
मुंबई: भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. दिल्लीतील भाजप मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी 16 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. भाजपच्या पहिल्या उमेदवारी यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक बड्या नेत्यांचा समावेश आहे. जे नेते हमखास निवडून येतील, अशाच नेत्यांचा पहिल्या उमेदवारी यादीत (BJP Candidate list) समावेश असेल, असे सांगितले जात होते. त्याप्रमाणेच उमेदवारी यादीत भाजपच्या हेवीवेट नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये 34 मंत्र्यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील.
भाजपच्या पहिल्या उमेदवारी यादीत महाराष्ट्रातील एकाही मतदारसंघाचा समावेश नव्हता. महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची यादी दुसऱ्या टप्प्यात जाहीर होईल, असा अंदाज आहे. तर गुजरातच्या गांधीनगरमधून अमित शाह, राजकोटमधून पुरुषोत्तम रुपाला, पोरबंदरमधून मनसुख मांडवीय आणि नवसारी लोकसभा मतदारसंघातून चंद्रकांत पाटील उर्फ सी.आर. पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
दिल्लीतून सुषमा स्वराज यांच्या मुलीला उमेदवारी
भाजप पहिल्या उमेदवारी यादीत दिल्लीतून कोणत्या नेत्यांना संधी देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांची कन्या बांसुरी स्वराज हिच्या नावाची जोरदार चर्चा होती. ही चर्चा अखेर खरी ठरली. भाजपकडून बांसुरी स्वराज यांना नवी दिल्ली मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. तर चांदनी चौक लोकसभा मतदारसंघातून अभिनेता अक्षय कुमारच्या नावाची चर्चा होती. परंतु, या मतदारसंघातून भाजपने प्रवीण खंडेलवाल यांना संधी दिली आहे. तर उत्तर दिल्लीतून भाजपने मनोज तिवारी, पश्चिम दिल्लीतून कमलजीत सहरावत आणि दक्षिण दिल्लीत रामबीर सिंह बिधुडी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
#WATCH | "PM Modi to contest Lok Sabha elections from Varanasi, Union Minister Kiran Rijiju to contest from Arunachal West, BJP MP Bishnu Pada Ray to contest from Andaman & Nicobar, BJP MP Tapir Gao to contest from Arunachal East, Union Minister Sarbananda Sonowal to contest from… pic.twitter.com/0DqiBuhmwJ
— ANI (@ANI) March 2, 2024
शिवराज सिंह चौहान दिल्लीत जाणार
मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत भाजपने लोकप्रिय मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना काहीसे दूर ठेवले होते. पुन्हा सत्ता आल्यानंतरही त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आले नव्हते. तेव्हापासून शिवराज सिंह चौहान यांचे राजकीय भविष्य काय असणार, याची चर्चा रंगली होती. परंतु, आता भाजपने शिवराज सिंह चौहान यांना विदिशी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात शिवराजसिंह चौहान दिल्लीत जाणार, हे स्पष्ट झाले आहे. तर गुना लोकसभा मतदारसंघातून ज्योतिरादित्य सिंधिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
आणखी वाचा
मोठी बातमी: भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर, मोदी-शाहांकडून कोणाला संधी?