Bihar Election : बिहार निवडणुकीत आप सर्व जागा लढणार, पहिली उमेदवार यादी जाहीर, आयोगाच्या पत्रकार परिषदेपूर्वीच घोषणा
Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीनं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 11 जणांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीकडून पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत आम आदमी पार्टीनं 11 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. पहिल्या यादीत आपनं 2 महिलांना संधी दिली आहे. आम आदमी पार्टी बिहारमधील सर्व जागा लढणार आहे. अरविंद केजरीवालांचा पक्ष पहिल्यांदाच बिहारच्या निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळेल.
AAP Declared First List for Bihar : आम आदमी पार्टीची पहिली यादी जाहीर
पहिल्या यादीत पाटणा जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारासंघांचा समावेश आहे. फुलवारी शरीफ मधून अरुण कुमार रजक आणि बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून डॉ. पंकज कुमार यांना उमेदवार करण्यात आलं आहे. बेगूसराय विधानसभा मतदारसंघातून डॉ. मीरा सिंह आणि दरभंगाच्या कुशेश्वरस्थान विधानसभा मतदारसंघातून योगी चौपाल यांना उमेदवारी दिली आहे. सारणच्या तरैया मतदारसंघातून अमित कुमार सिंहला संधी दिली आहे.
पूर्णियाच्या कस्बा विधानसभा मतदारसंघातून भानू भारतीय, मधुबनीच्या बेनीपट्टी विधानसभा मतदारसंघातून सुभदा यादव, किशनगंज विधानसभा मतदारसंघातून अशरफ आलम, सीतामढीच्या परिहार विधानसभा मतदारसंघातून अखिलेश नारायण ठाकूर, मोतिहारीच्या गोविंदगजमधून अशोक कुमार सिंह, बक्सरमधून धर्मराज सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
आम आदमी पार्टीचे बिहार प्रदेशाध्यक्ष राकेश कुमार यादव यांनी आमच्या पक्षाकडे उमेदवारी मागण्यासाठी 600 जणांनी बायोडाटा पाठवल्याचं म्हटलं. जे या राज्यात चांगलं काम करत आहेत त्यांना पहिल्यांदा संधी दिली जाणार आहे. त्यानंतर 11 उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
राकेश कुमार यादव यांनी म्हटलं की लोक पक्षासाठी काम करत आहेत. लवकरच दुसरी आणि तिसरी यादी जाहीर करण्यात आली होती. आमच्या पक्षाचं दिल्लीचे जे मॉडेल आहे. त्याच मॉडेलवर बिहारच्या सर्व विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढणार आहोत. बिहारच्या सर्व विधानसभा मतदारसंघात पूर्ण ताकदीनं लढणार असल्याचं राकेश कुमार यादव म्हणाले.
निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद
बिहार विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. आज बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. यावेळी प्रथमच बिहार विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होईल, असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. बिहारमध्ये सध्या जदयू आणि भाजपच्या युतीची सत्ता आहे. दुसरीकडे त्यांच्यासमोर राजद आणि काँग्रेसच्या महागठबंधनचं आव्हान आहे. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगानं राबवलेली मतदार यादीची एसआयआर प्रक्रिया वादात अडकली होती.
दरम्यान, आज बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा जाहीर होण्यापूर्वीच आम आदमी पार्टीनं पहिली यादी जाहीर केली आहे.



















