Bihar Election : नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री होणार का? अमित शाह म्हणाले, ते आमदार ठरवतील
Amit Shah on Bihar CM Face : नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए बिहारची निवडणूक लढवणार असून त्यांच्यावर बिहारच्या जनतेचा विश्वास असल्याचं अमित शाह म्हणाले.

Bihar Assembly Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत निर्णायक ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे.
पटना येथील एका कार्यक्रमात बोलताना अमित शहा म्हणाले, “मी कोणाला मुख्यमंत्री बनवणारा नाही. इतक्या पक्षांचं गठबंधन आहे. निवडणुकीनंतर आमदारांची बैठक होईल आणि तेव्हाच नेता ठरवला जाईल. सध्या मात्र आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढत आहोत, आणि तेच आमच्या प्रचार मोहिमेचे नेतृत्व करत आहेत.”
बिहारच्या जनतेला नितीश कुमारांवर विश्वास
अमित शहा म्हणाले की, “आजही आमच्याकडे अधिके आमदार आहेत, तरीही मुख्यमंत्री नितीश कुमारच आहेत. त्यांच्यावर फक्त भाजपच नव्हे, तर बिहारच्या जनतेलाही विश्वास आहे.
नितीश कुमार यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल बोलताना शहा म्हणाले की, “नितीश कुमार भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे नेते आहेत. त्यांचा काँग्रेसशी संबंध कधीच जास्त काळ राहिला नाही. त्यांनी कधीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला नाही आणि ज्या काळात ते काँग्रेससोबत होते तो काळही जास्तीत जास्त दोन अडीच वर्षांचा होता.”
नितीश कुमार काँग्रेसविरोधी
अमित शहा यांनी नितीश कुमार यांच्या राजकीय विचारसरणीचा उल्लेख करताना सांगितले, “नितीश कुमार समाजवादी विचारधारेतून आलेले नेते आहेत. लहानपणापासूनच ते काँग्रेसच्या विरोधात होते. जेपी आंदोलनात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती आणि आणीबाणीच्या काळात काँग्रेसच्या विरोधात ठाम उभे राहिले.”
अमित शहा यांनी शेवटी स्पष्ट केले की, "भाजपलाच नव्हे, तर बिहारच्या जनतेलाही नितीश कुमारांवर पूर्ण विश्वास आहे. एनडीए नितीश यांच्या नेतृत्वाखालीच निवडणुकीला सामोरे जाणार आहे.”
NDA Seat Distribution Details : एनडीए जागावाटपाचा तपशील
भाजप (BJP) – 101 जागा
जदयू (JDU) – 101 जागा
लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) (LJP-Ram Vilas) – 29 जागा
राष्ट्रीय लोक मोर्चा (RALOMO) – 6 जागा
हिंदुस्तानी अवाम मोर्चा (HAM) – 6 जागा
Bihar Assembly Election Date : बिहारमध्ये दोन टप्प्यात मतदान
केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केल्यानुसार, बिहारमध्ये 243 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात 121 जागांसाठी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 6 नोव्हेंबरला होणार आहे.
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान 11 नोव्हेंबरला होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 122 जागांवर होणार आहे. तर, मतमोजणी 14 नोव्हेंबरला होणार आहे.
Bihar Vidhansabha Seats Detail : बिहारचे पक्षीय बलाबल
एकूण सदस्यसंख्या (Total Seats) – 243
राष्ट्रीय जनता दल (RJD) – 79
भारतीय जनता पक्ष (BJP) – 78
जनता दल (युनायटेड) – JD(U) – 45
काँग्रेस (Congress) – 19
CPI (Marxist–Leninist) Liberation – 12
हिंदुस्तानी अवाम मोर्चा (HAM-Secular) – 4
CPI – 2
CPI (M) – 2
AIMIM – 1
अपक्ष आमदार (Independent MLA) – 1
ही बातमी वाचा:
























