Bank Fraud Case : भूषण पॉवर अँड स्टीलचे मालक संजय सिंघलांचे 30 कोटींचे विमान जप्त, ईडीची कारवाई
Bank Fraud Case : ईडीने भूषण पॉवर आणि स्टीलचे मालक संजय सिंघल (sanjay singal ) यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत तपासात एक विमान जप्त केले आहे. या विमानाची किंमत 30.91 कोटी रुपये आहे.
Bank Fraud Case : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) भूषण पॉवर आणि स्टीलचे मालक संजय सिंघल यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत तपासात एक विमान जप्त केले आहे. या विमानाची किंमत 30 कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान ईडीने आतापर्यंत संजय सिंघल यांच्याशी संबंधित कंपन्यांची 4454 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने मनी लाँडरिंग विरोधी कायद्याअंतर्गत ही कारवाई केली आहे.
ईडीने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनानुसार, 'सेस्ना 525A CJ 2Plus' विमान भूषण एअरवेज सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे आहे. सिंघल हे या कंपनीचे मालक आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार, मनी लाँडरिंगविरोधी कायद्यांतर्गत नवीन आदेश जारी केल्यानंतर बुधवारी हे विमान जप्त करण्यात आले आहे. या विमानाची किंमत 30.91 कोटी रुपये आहे.
अंमलबजावणी संचालनालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने 2019 मध्ये नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने हा तपास सुरू केला होता. ही एफआयआर भूषण पॉवर अँड स्टील लिमिटेड कंपनी आणि तिचे मालक संजय सिंघल आणि इतरांविरुद्ध होती. या एफआयआरमध्ये गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक करणे आणि बनावट कागदपत्रे वापरणे इत्यादी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय सिंघल यांनी त्यांच्या कंपन्यांच्या माध्यमातून बँकांकडून घेतलेले कर्जाची रक्कम इतर कंपन्यांना पाठवली होती, असे ईडीने केलेल्या तपासादरम्यान समोर आले आहे. संजय सिंघल यांनी विमान खरेदीसाठी बँकेच्या कर्जाची रक्कम वापरल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी ईने 25 आरोपींविरुद्ध आरोपपत्र न्यायालयासमोर सादर केले असून, त्यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
ईडीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेले विमान संजय सिंघल यांच्या भूषण एअरवेज सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान ईडीने संजय सिंघल आणि त्यांच्या लंडन, मुंबई आणि दिल्लीतील कंपन्यांची मालमत्ता जप्त केली होती.