(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ram Mandir : ठरलं! अयोध्येत 'या' दिवशी विराजमान होणार रामलला, भाविकांना दर्शन कधी मिळणार?
Ayodhya Ram Mandir Update : अयोध्येतील राममंदिरात रामललाची प्रतिष्ठापना कधी होणार आणि राममंदिर कधीपासून भाविकांना दर्शनासाठी खुलं होणार याची प्रतीक्षा आहे. याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.
Ayodhya Ram Mandir Update : अयोध्येत राममंदिराचं काम वेगानं सुरु आहे. राममंदिरात रामललाची प्रतिष्ठापना कधी होणार आणि राममंदिर कधीपासून भाविकांना दर्शनासाठी खुलं होणार याची प्रतीक्षा आहे. याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये अयोध्येमध्ये रामललाची प्रतिष्ठापना होणार असून त्यानंतर राम मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे, अशी माहिती राम जन्मभूमी न्यासचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरीजी महाराज यांनी दिली आहे. नाशिकमध्ये गोविंददेव गिरीजी महाराज यांच्याशी एबीपी माझानं संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
त्यांनी सांगितलं की, फेब्रुवारी 2024 मध्ये रामललाची नूतन गर्भगृहात स्थापना करणार आहोत. त्यावेळी पहिला मजला, गर्भगृह होईल, लोकांच्या दर्शनाची व्यवस्था होईल आणि दुसरीकडे मंदिरचे बांधकाम चालू राहील, असंही ते म्हणाले.
अयोध्येला जाण्यामागे राजकीय हेतू पेक्षा श्रद्धा असावी
गोविंददेव गिरीजी महाराज यांनी म्हटलं की, अयोध्येचा राम सर्वांचा आहे. कोणालाही वाटते अयोध्येला जावे दर्शन घ्यावे. त्यावर कुणाचा प्रतिबंध असू नये. रामाचा विरोध करणारा रावण जरी असेल आणि त्याने अयोध्येला जाण्याची इच्छा व्यक्त केली तरी कोणी रोखू नये, असं त्यांनी म्हटलं. अयोध्येला जाण्यामागे राजकीय हेतू पेक्षा श्रद्धा असावी, असंही ते म्हणाले.
गोविंददेव गिरीजी महाराज यांनी म्हटलं की, ज्ञानवापीमध्ये जो तपास चालू आहे तो नवीन नाही, याप्रकारचे ऐतिहासिक पुरावे पुष्कळ शतकाच्या आधीच मिळाले होते. पुरातन काळातील नंदी आहे. त्याचे तोंड मशिदीकडे त्यामुळे तिथे शिवलिंग मिळणे, इतरही काही मूर्ती मिळणे हे स्वाभाविक आहे. तीन मंदिरं आम्हाला देऊन टाका चौथ्या कुठल्याही मंदिराचा वाद होणार नाही, ही भूमिका अशोक सिंघल यांनी मांडली होती. कुणी भडकविण्याची भाषा करू नये, सर्वांना सोबत घ्यावे, असंही ते म्हणाले.
त्यांनी म्हटलं की, मुस्लिम समाजातील तरुण, परिपक्व वर्गाला विवाद वाढवू नये, सहमतीने सर्व करावे असे वाटत आहे. मुस्लिम समाज स्वतःहून पुढे येईल. सलोख्याच्या वातावरणात प्रश्न मिटेल. मुस्लिम पक्षकार त्यांचे दावे करतीलच पण वस्तुस्थिती काय आहे हे बघितले पाहिजे, असंही ते म्हणाले.
ताजमहालच्या ठिकाणी राजपुतांनी बांधलेले शिवमंदिर
त्यांनी म्हटलं की, मी विद्यार्थी दशेत तेजोमहालाय हे पुस्तक वाचले होते, आम्हा सर्वांना विश्वास आहे. ताजमहालच्या ठिकाणी राजपुतांनी बांधलेले शिवमंदिर होते, त्याचे तेजोमहालय नाव होते. केवळ शाहजहानने बांधलेली इमारत नव्हती, तर काहीतरी हिंदूंची मूळ वास्तू होती अशी शक्यता आहे. ज्या खोल्या बंद केल्यात त्या उघड्या करून त्याचे रेकॉर्डिंग करून घ्यावे म्हणजे प्रश्न मिटतील, असंही त्यांनी म्हटलं आहे.
समान नागरी कायदा नसणे हे रानटीपणाचे लक्षण
त्यांनी यावेळी म्हटलं की, समान नागरी कायदा नसणे हे रानटीपणाचे लक्षण आहे. जगातील कुठल्याही देशात असा भेदभाव केला जात नाही, सर्वांकरिता एक कायदा असणे हे नैसर्गिक आहे. सर्वांकरिता एक कायदा असणे यालाच सेक्युलर म्हणता येईल अन्यथा त्या देशाला सेक्युलर म्हणता येणार नाही.