Ram Mandir : अयोध्येत येऊन रामलल्लाचे दर्शन घ्या... राम मंदिर पाहा; संघाचे स्वयंसेवक घराघरात जाऊन देणार निमंत्रण
Ram Mandir : संघाचे स्वयंसेवक घरोघरी जाऊन राम मंदिराला भेट देण्यासाठीचे आमंत्रण देणार आहेत.
भुज, गुजरात : बहुप्रतिक्षित अयोध्येतील राम मंदिराचे (Ram Temple) लोकार्पण 22 जानेवारी रोजी होणार आहे. त्याची जय्यत तयारी अयोध्येत (Ayodhya) सुरू असून राम मंदिर उभारणीतील (Ram Mandir) शेवटच्या टप्प्यातील कामे पूर्ण करण्यावर जोर दिला जात आहे. तर, दुसरीकडे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघही (RSS) सरसावला आहे. संघाचे स्वयंसेवक घरोघरी जाऊन राम मंदिराला भेट देण्यासाठीचे आमंत्रण देणार आहेत.
गुजरातमधील भुजमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या तीन दिवसीय बैठक पार पडली. या बैठकीत आगामी कार्यक्रम, लोकसभा निवडणुकांबाबतही चर्चा झाल्याचे समजते. काही महत्त्वाचे निर्णय या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेत. एक जानेवारी 2024 ते 15 जानेवारी 2024 दरम्यान संघाचे लाखो स्वंयसेवक देशभरातील घराघरात जाणार आणि राम मंदिर पाहण्यासाठी रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला या असे निमंत्रण देणार आहे. संघाचे सरकार्यावाह दत्तात्रय होसबळे यांनी आज भुज मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्या संदर्भातील माहिती दिली.
पाच लाख गावांमध्ये पोहचणार असल्याचा दावा
या निमंत्रणासह राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वतीने दिले जाणारा श्रीरामाचे चित्र, राम मंदिराचा चित्रही प्रत्येक घरात दिला जाणार आहे. राम मंदिरासाठी समर्पण निधी गोळा करतानाही संघाच्या स्वयंसेवकांनी 45 दिवसात देशभरातील सुमारे पाच लाख गावांमध्ये संपर्क साधला होता. यंदा पंधरा दिवसाच्या काळात तेवढाच मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क अभियान संघाकडून राबवले जाणार असल्याची माहिती होसबळे यांनी दिली.
संघाची अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची विशेष बैठक 5 ते 7 नोव्हेंबर दरम्यान गुजरात मधील भुज या ठिकाणी पार पडली. या बैठकीत संघाचे देशभरातील सर्व प्रांत संघचालक, प्रांत कार्यवाह आणि प्रांत प्रचारक सहभागी झाले होते.
17 जानेवारीपासून अयोध्येत पूजा सुरू
17 जानेवारीपासूनच अयोध्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठापणा विधीला सुरुवात होणार आहे. या विधीचे प्रमुख लक्ष्मीकांत दीक्षित यांनी एका मुलाखतीत सांगितले की, 17 जानेवारीला जलयात्रेने धार्मिक विधी सुरू होतील. गणेश पूजनाने विधी सुरू होईल. 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापणा होईल.