यंदा थंडीत बसणार उन्हाचे चटके, नोव्हेंबरमध्ये देशात राहणार सरासरीपेक्षा अधिक तापमान
High Temperatures : नोव्हेंबर महिन्यात देशात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक तापमान (Temperatures) राहण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. सरासरीपेक्षा तापमान अधिक राहणार असल्यामुळे महाराष्ट्रात देखील गुलाबी थंडी नसेल.
मुंबई : यंदा हिवाळ्यात थंडी ऐवजी उन्हाचे चटके बसणार आहेत. कारण नोव्हेंबर महिन्यात देशात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक तापमान (Temperatures) राहण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. सरासरीपेक्षा तापमान अधिक राहणार असल्यामुळे यंदा महाराष्ट्रात देखील गुलाबी थंडी नसेल. तर उत्तर महाराष्ट्रातील काही भाग सोडता राज्यातील इतर ठिकाणी देखील सरासरीपेक्षा अधिकच किमान तापमान राहण्याची शक्यता आहे.
Maximum temperature and Minimum Temperature Outlook for November 2022 pic.twitter.com/Vkux6ZM2ub
— India Meteorological Department (@Indiametdept) November 1, 2022
दर वर्षी ऑक्टोबर महिन्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा बसत असतो. परंतु, यंदा ऑक्टोबर महिन्यात हिट ऐवजी पावसाने धुमाकूळ घातला. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ७० टक्के अधिक पाऊस पडला आहे. सर्वाधिक मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 104 टक्के पाऊस पडला असून मराठवाड्यात सरासरीपेक्षा 79 टक्के, विदर्भात सरासरीपेक्षा 51 टक्के तर कोकणात 45 टक्के अधिक पाऊस पडला आहे. त्यामुळे यंदा थंडी देखील जास्त कडक पडेल असा अंदाज होता. परंतु, भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार नोव्हेंबर महिन्यात देशात सरासरी ते सरासरीपेक्षा अधित तापमाम राहिल. महाराष्ट्रात देखील सरासरीपेक्षा अधिकच किमान तापमान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
ऑक्टोबर हिटचा अनुभव यंदा नोव्हेंबर महिन्यात येणार आहे. त्यामुळे थंडीच्या महिन्यात उन्हाने लाही लाही होणार आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात स्वेटर वापरायचा की कॉटनचे कपडे, हा गोंधळ राहणार आहे. परंतु, गुलाबी थंडी ऐवजी यंदा नोव्हेंबरमध्ये कडक उन्हाचे चटके अनुभवावे लागणार आहेत.
ऑक्टोबर हिट' म्हणजे नेमके काय?
ऑक्टोबर महिन्यात दक्षिण-पश्चिम मान्सूनचे वारे कमकुवत होतात आणि हळूहळू माघार घेऊ लागतात. पावसाळा संपून हिवाळयाला सुरुवात होण्याचा हा काळ असतो. हा बदल होत असताना जो संक्रमणाचा काळ असतो तो ऑक्टोबर महिन्यात येत असतो. या दिवसांत पाऊस थांबलेला असतो अशा वेळी आकाशातून सूर्याची किरणे सरळ धरतीला स्पर्श करत असतात. या अतिनील किरणांमुळे जी उष्णता या महिन्यात वाढते या उष्णतेलाच ऑक्टोबर हिट म्हटले जाते.
ऑक्टोबर हा महिना मुंबईत दर वर्षी उष्णतेच्या बाबतीत अगदी जीवघेणा समजला जातो. आधीच उकाड्याने हैराण होणाऱ्या मुंबईकरांना ऑक्टोबर हिट अजून हैराण करत असते. यंदा मात्र मुंबईकरांना हा अनुभव नोव्हेंबर महिन्यात येणार आहे.