Arvind Kejriwal : 50 दिवसांनी जेलमधून येताच केजरीवाल मोदींवर तुटून पडले; म्हणाले, 140 कोटी जनतेकडं भीक मागतो, देश वाचवा
Arvind Kejriwal : लवकरच मोदी स्वतः 75 वर्षांचे होणार आहेत. ते लवकरच पंतप्रधानपदावरून पायउतार होणार आहेत. त्यांनी केलेले नियम पाळणार का? अशी विचारणा त्यांनी केली.
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 10 मे 2024 रोजी तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आज (11 मे) शनिवारी प्रथमच जाहीर सभेला संबोधित केले. केजरीवाल यांनी पीएम मोदी आणि भाजप सरकारवर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले की, "तुमच्या सर्वांमध्ये परत आल्याने मला खूप आनंद होत आहे. सर्वांनी मिळून आपल्या देशाला हुकूमशाहीपासून वाचवायचे आहे. मी माझ्या सर्व शक्तीनिशी लढेन. मला देशातील 140 कोटी जनतेच्या पाठिंब्याची गरज आहे."
भाजपच्या सर्व विरोधी नेत्यांना संपवायचे आहे
पंतप्रधान म्हणतात, 'मी भ्रष्टाचाराशी लढत आहे पण यांनी देशातील मोठमोठे चोर, भ्रष्टाचाऱ्याचा आपल्या पक्षात समावेश केला. मला त्यांना सांगायचे आहे की, जर तुम्हाला भ्रष्टाचाराविरुद्ध लढायचे असेल तर तुम्ही माझ्याकडून शिकले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता एक नवीन मिशन सुरू केले आहे. 'वन नेशन वन लीडर' हे त्यांचे ध्येय आहे. पीएम मोदी हे मिशन एका निश्चित रणनीतीनुसार राबवत आहेत. या रणनीतीनुसार भाजपच्या सर्व विरोधी नेत्यांना संपवायचे आहे.
'प्रत्येकाला तुरुंगात पाठवण्याचे धोरण'
भाजप सरकार विरोधी नेत्यांना तुरुंगात पाठवायचं आहे. त्यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात पाठवले. आता त्यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना तुरुंगात पाठवायचे आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यासाठी त्यांनी अनेक मंत्र्यांना तुरुंगात पाठवले. दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन, मनीष सिसोदिया, संजय सिंह यांच्यासह अनेक मंत्र्यांना तुरुंगात पाठवण्यात आले. येत्या काही दिवसांत ते तेजस्वी यादव, पी विजयन यांसारख्या नेत्यांना तुरुंगात पाठवतील. त्याचप्रमाणे त्यांना एक एक करून सर्वांना घाबरवायचे आहे. मी या हुकूमशाहीशी लढेन, मी देशवासियांना विनवणी करतो, तुम्ही देशाला वाचवा.
केजरीवाल यांनी सांगितले की, मित्रांनो, ही पंतप्रधान मोदींची हुकूमशाही आहे. पंतप्रधान मोदींना हे देशावर लादायचे आहे. असे झाल्यास राज्यघटना रद्द होईल. संविधान वाचवण्यासाठी आता केंद्र सरकारला सत्तेतून बेदखल करण्याची गरज आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी 2014 मध्ये एक आदर्श ठेवला की 75 वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्री होणार नाही. लवकरच ते स्वतः 75 वर्षांचे होणार आहेत. ते लवकरच पंतप्रधानपदावरून पायउतार होणार आहेत. त्यांनी केलेले नियम पाळणार का?
इतर महत्वाच्या बातम्या