Arvind Kejriwal | पुढचा आदेश येईपर्यंत दिल्लीच्या सर्व सरकारी-खासगी शाळा बंद, दिल्ली सरकारचा निर्णय
दिल्लीतील (Delhi) कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी दिल्लीतील सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलाय.
नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या पुढच्या सूचना येईपर्यंत राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा बंद राहतील असा आदेश शुक्रवारी दिल्ली सरकारने काढला आहे. दिल्लीमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे, त्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली आहे.
अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ट्वीटमध्ये सांगितलंय की, दिल्लीतील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, सर्व खासगी क्लासेस हे दिल्ली सरकारच्या पुढच्या सूचना येईपर्यंत बंद राहतील.
कोविड के बढ़ते मामलों के कारण, दिल्ली में सभी स्कूल (सरकारी, प्राइवेट सहित), सभी क्लासेज के लिए अगले आदेश तक बंद किए जा रहे हैं।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 9, 2021
दिल्लीमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या जलद गतीने वाढत आहे. शुक्रवारी सकाळची आकडेवारी लक्षात घेता दिल्लीमध्ये एकाच दिवसात 7437 कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे तर 24 जणांचा मृत्यू झाला आहे. त्या आधीच्या दिवशी 5506 रुग्णाची भर पडली होती. आतापर्यंत दिल्लीमध्ये 6,98,008 लोकांना कोरोनाची लागण झाली असून 11,157 रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला आहे.
देशातील अनेक राज्यांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे त्या-त्या राज्य सरकारांनी काही कडक पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. या आधी उत्तर प्रदेश सरकारनेही अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे. काही राज्यात मिनी लॉकडाऊन लावण्यात आला आहे तर काही राज्यात नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. महाराष्ट्रातही वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आला असून अनेक नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं चित्र आहे. राज्यात शुक्रवारी 58, 993 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे नवीन 45391 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 2695148 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण 534603 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.96% झाले आहे. गुरूवारी 56 हजार 286 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती.
महत्वाच्या बातम्या :