"...तर काश्मीरमध्ये तिरंगा दिसणार नाही"
संविधानातील ही कलमे रद्द केली तर जम्मू काश्मीरमध्ये कुठे तिरंगा दिसणार नाही, असं वक्तव्य नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार जावेद अहमद राणा यांनी केलं आहे.
श्रीनगर : जम्मू काश्मीरला इतर राज्यांपेक्षा विशेष दर्जा घटनेनं दिला आहे. जम्मू-काश्मीरला 370 कलमामुळे हा विशेष दर्जा मिळाला आहे. संविधानातील कलम 370 आणि 35अ बाबत नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार जावेद अहमद राणा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
संविधानातील ही कलमे रद्द केली तर जम्मू काश्मीरमध्ये कुठे तिरंगा दिसणार नाही, असं राणा यांनी म्हटलं आहे.
राणा मेंढरमधील छूंगा गावातील एका सभेत बोलत होते. "परिच्छेद '35-अ'मध्ये कुठल्याही प्रकारचा बदले केला किंवा कलम 370 रद्द केल्यास जम्मू काश्मीरमध्ये तिरंगा दिसणार नाही", असा इशारा आमदार जावेद अहमद राणा यांनी दिला आहे.
कलम 370 मुळे जम्मू काश्मीरमधील नागरिकांना विशेष अधिकार प्राप्त झाले आहेत. या कलमान्वये जम्मू काश्मीर विधानसभेला कोणतेही कायदे बनवण्याचे अधिकार आहेत. 370 कलम रद्द केल्यास इतर राज्यातील लोक आपल्या राज्यात येऊन येथे संपत्ती खरेदी करतील.
या कलमामुळे जम्मू काश्मीरमधील नागरिकांना नोकऱ्या मिळत आहेत, त्या बंद होतील. विद्यार्थ्यांनाही याचा मोठा फटका बसू शकतो, असं राणा म्हणाले.