Air India : एअर इंडियाकडून इस्रायलला जाणारी सर्व उड्डाणं पुन्हा रद्द, 'या' तारखेपर्यंत राहणार सेवा ठप्प
Israel-Hamas War : एअर इंडिया कंपनीकडून तेल अवीवला जाणारी सर्व उड्डाणं 18 ऑक्टोबरपर्यंत सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.
नवी दिल्ली : इस्रायल (Israel) आणि हमासमध्ये (Hamas) सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने (Air India) मोठा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाने इस्रायलमधील तेल अवीवला जाणारी सर्व उड्डाणं रद्द केली आहेत. एअर इंडियाने 18 ऑक्टोबरपर्यंत त्यांची सर्व उड्डाणं रद्द केल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. एअर इंडियाच्या अधिकाऱ्याने वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, गरजेनुसार ते प्रवाशांसाठी त्यांचे चार्टड प्लेन वापरतील.
आआधी एअर इंडियाने 14 ऑक्टोबरपर्यंत त्यांची सर्व उड्डाणं रद्द केली होती. नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन तेल अवीवसाठी दर आठवड्याला पाच उड्डाणं केली जातात. ही सेवा सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी असते. या दिवशी नवी दिल्ली ते इस्रायलची आर्थिक राजधानी असलेल्या तेल अवीवसाठी एअर इंडियाचे विमान उड्डाण करते. इस्रायलमधून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन अजय अंतर्गत एअरलाइनने दोन उड्डाणे देखील चालवली आहेत.
या आधी 14 ऑक्टोबरपर्यंत केली होती उड्डाणं रद्द
याच युद्धाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाकडून 14 ऑक्टोबरपर्यंतची सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली होती. प्रवाश्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचं एअर इंडियाकडून सांगण्यात आलं होतं. पण आता पुन्हा एकदा त्याच कारणास्तव ही उड्डाणं 18 ऑक्टोबर पर्यंत रद्द करण्यात आली आहेत. तर जे तिकीट्स 9 ऑक्टोबरपूर्वी काढण्यात आली होती आणि ज्यांची वैध्यता 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत आहे, अशी तिकीटे रद्द करण्यासाठी किंवा रीशेड्युल करण्यासाठी देखील एअर इंडियाकडून सूट देण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
235 भारतीय विशेष विमानाने दिल्लीला पोहोचले
ऑपरेशन अजय अंतर्गत, आतापर्यंत 400 हून अधिक भारतीय इस्रायलमधून मायदेशी परतले आहेत. शुक्रवार (13 ऑक्टोबर) रोजी 235 भारतीय नागरिकांना घेऊन एक विशेष विमान दिल्लीला पोहोचले. यावेळी परराष्ट्र राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले.
भारताने 'ऑपरेशन अजय' सुरू केले
तर गुरुवार (12 ऑक्टोबर) रोजी 212 भारतीयांना विशेष विमानातून भारतात आणण्यात आले. भारताने गुरुवारी (12 ऑक्टोबर) 'ऑपरेशन अजय'ची घोषणा केली होती. या ऑपरेशनद्वारे इस्रायलमधून भारतात येणाऱ्या लोकांनाच परत आणले जात आहे.
300 पेक्षा अधिक लोकांनी गमावली जीव
शनिवारी (7 ऑक्टोबर) हमासने इस्रायलवर हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत 1,300 हून अधिक इस्रायली ठार झाले आहेत. तर इस्रायलने केलेल्या कारवाईमध्ये 2,215 पॅलेस्टाईनचे लोक ठार झालेत. या युद्धामध्ये आतापर्यंत 8,714 लोकांनी जीव गमावला.