Air India Plane Crash : एअर इंडिया अपघातातील ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले, भारत सरकारनेही व्यक्त केली भूमिका
Air India Crash Dead Body Mix Up : एअर इंडियाच्या दुःखद विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ब्रिटिश नागरिकांच्या कुटुंबियांना त्यांच्या प्रियजनांचे मृतदेह चुकीच्या पाठवण्यात आल्याचा दावा टाईम्स ऑफ इंडियाने डेली मेलच्या हवाल्याने केला आहे.

Air India Crash Dead Body Mix Up : एअर इंडियाच्या दुर्दैवी विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ब्रिटिश नागरिकांच्या कुटुंबियांना त्यांच्या प्रियजनांचे मृतदेह चुकीचे पाठवण्यात आल्याचा दावा टाईम्स ऑफ इंडियाने डेली मेलच्या हवाल्याने केला आहे. अहवालांनुसार, आतापर्यंत अशी दोन प्रकरणे समोर आली आहेत, अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया विमानाच्या अपघातातील काही ब्रिटिश नागरिकांच्या मृतदेहांची अदलाबदल झाल्याचा किंवा चुकीचे मृतदेह पाठवल्याचा दावा करण्यात आला आहे. काही कुटुंबियांना त्यांच्या प्रियजनांऐवजी भलत्याच व्यक्तींचे मृतदेह मिळाले असल्याचाखळबळजनक आरोप 'द डेली मेल' या वृत्तपत्राने केला आहे. ब्रिटिश माध्यमांनुसार, ब्रिटनमधील दोन कुटुंबांना विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ब्रिटिश नागरिकांऐवजी चुकीच्या मृतदेहांचे अवयव पाठवण्यात आले आहेत.हा प्रकार समोर आल्यानंतर कुटुंबियांनी अंत्यसंस्कार थांबवले आणि चौकशीची मागणी केली.
डीएनए चाचणीद्वारे मृतदेहांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ही चूक उघडकीस आली. अपघातानंतर, ब्रिटिश नागरिकांचे कुटुंबिय भारतात आले होते आणि त्यांनी मृतदेह मिळविण्यासाठी डीएनएचे नमुने दिले. त्यानंतर, भारतातून डीएनए चाचणी केल्यानंतर मृतदेह ब्रिटिश कुटुंबांना सोपवण्यात आले. मा लंडनमध्ये पुन्हा एकदा डीएनए चाचणी केल्यानंतर चूक पकडली गेली. या प्रकारामुळे इतर मृतदेहांची ओळख पटवण्यात चुका झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बहुतेक मृतदेहांवर त्यांच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कार केले आहेत.
नातेवाईकांनी दिलेल्या नमुन्यांशी डीएनए जुळत नाही
अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, जेव्हा इनर वेस्ट लंडनच्या कोरोनर डॉ. फियोना विल्कॉक्स यांनी कुटुंबांनी दिलेल्या नमुन्यांशी त्यांचे डीएनए जुळवून युकेला पाठवलेल्या ब्रिटिश नागरिकांची ओळख पडताळण्याचा प्रयत्न केला तेव्हा ही बाब उघडकीस आली. एअर इंडियाच्या दुर्घटनेनंतर किमान 12 ब्रिटिश मृत व्यक्तींचे मृतदेह मायदेशी परत आणण्यात आले आहेत, असे अनेक ब्रिटिश कुटुंबांचे प्रतिनिधित्व करणारे वकील जेम्स हीली-प्रॅट यांच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे. जेम्स यांनी सांगितले की त्यांची टीम एअर इंडिया आणि त्यांच्या आपत्कालीन विक्रेत्या केनियान्स इंटरनॅशनल इमर्जन्सी सर्व्हिसेसकडून येणाऱ्या प्रतिसादाची वाट पाहत आहे.
भारत सरकारने काय म्हटलंय?
या प्रकरणात सरकारनेही यावर प्रतिसाद दिला आहे. सरकारचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, "आम्ही अहवाल पाहिले आहेत आणि या चिंता आणि मुद्दे आमच्या लक्षात आणून दिल्यापासून आम्ही युकेसोबत काम करत आहोत. या दुर्दैवी अपघाताच्या पार्श्वभूमीवर, संबंधित अधिकाऱ्यांनी स्थापित प्रोटोकॉल आणि तांत्रिक आवश्यकतांनुसार मृतदेहांती ओळख पटवली होती. सर्व पार्थिव अवयव अत्यंत व्यावसायिकतेने आणि मृतांच्या प्रतिष्ठेचा पूर्ण आदर ठेवून जतन करण्यात आले. या समस्या, चिंता दूर करण्यासाठी आम्ही यूके अधिकाऱ्यांसोबत काम करत आहोत."
अपघातात 241 आणि जमिनीवरील 19 जणांचा मृत्यू
12 जून रोजी लंडनमधील गॅटविकला जाणारे बोईंग 787-8 द्वारे चालवले जाणारे एअर इंडियाचे विमान क्रमांक एआय 171 अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर लगेचच कोसळले. या अपघातात विमानातील 242 प्रवाशांपैकी 241 जणांचा मृत्यू झाला. यासोबतच 19 जणांचा जमिनीवर मृत्यू झाला. एजन्सींनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व मृतांची ओळख पटवण्यात आली आहे आणि त्यांचे मृतदेह अंतिम संस्कारांसाठी त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात आले आहेत. एअर इंडियाने मंगळवारी सांगितले की, त्यांनी त्यांच्या बोईंग 787 आणि 737 विमानांच्या ताफ्यातील इंधन नियंत्रण स्विच (FCS) च्या लॉकिंग यंत्रणेची "सावधगिरीची" तपासणी पूर्ण केली आहे आणि कोणतीही समस्या आढळली नाही.























