(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मी तसं म्हणालोच नाही, कृषी कायद्यासंदर्भातील 'त्या' वक्तव्यावर कृषीमंत्री तोमर यांचे स्पष्टीकरण...
कृषी कायदे रद्द केल्यामुळे आम्ही नाराज नाही. 'एक कदम पिछे हटे है, आगे फिर बढेंगे' असे वक्तव्य कृषीमंत्री तोमर यांनी केले होते. या वक्तव्यावर जोरदार टीका होत आहे. आता यावर तोमर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
नवी दिल्ली : कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर (Narendra Singh Tomar) यांनी कृषी कायद्यांबाबत केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या वक्तव्यावरुन राजकीय आरोप प्रत्यारोप देखील सुरू आहेत. कृषी कायदे रद्द केल्यामुळे आम्ही नाराज नाही. 'एक कदम पिछे हटे है, आगे फिर बढेंगे' असे विधान कृषीमंत्री तोमर यांनी केले होते. त्यांच्या या विधानामुळे कृषी कायद्यांबाबत केंद्र सरकार पुन्हा काही नवीन विचार करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. मात्र, तोमर यांनी या विधानावर अखेर स्पष्टीकरण दिले आहे.
नागपूरमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या कृषी शिखर संमेलनात बोलताना नरेंद्रसिंग तोमर यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल प्रसारमाध्यमांनी त्यांनी विचारला होता. याबवर बोलताना तोमर म्हणाले की, केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे चांगले होते. मात्र, काही कारणांमुळे ते रद्द करण्यात आले. भारत सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करेल. आम्ही पुन्हा कायदा आणू, असे मी म्हटले नव्हते, असे स्पष्टीकरण तोमर यांनी दिले आहे.
मोदी सरकारने 70 वर्षानंतर शेती क्षेत्रात बदल घडवणारे कायदे केले होते. मात्र, काही जणांना या सुधारणा योग्य वाटल्या नाहीत, अस म्हणत तोमर यांनी विरोधकांना टोला लगावला होता. शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. शेतकरी मजबूत राहीला तर देश मजबूत होणार असल्याचे तोमर म्हणाले. कोरोनाच्या क्षेत्राचा सर्व क्षेत्राला फटका बसला, मात्र, कृषी अर्थव्यवस्था या प्रतिकूल परिस्थितीतही मजबूत स्थितीत राहिल्याचे तोमर म्हणाले होते. तसेच 'एक कदम पिछे हटे है, आगे फिर बढेंगे' या त्यांच्या विधानामुळे वेगळीच चर्चा सुरू झाली होती.
कृषीमंत्री तोमर यांनी केलेल्या या वक्तव्यावर काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी देखील टीका केली आहे. केंद्र सरकारने जर आता शेतकरी विरोधी भूमिका घेतली, तर पुन्हा देशातील अन्नदाता आंदोलन करेल, असा इशारा राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दिला आहे. पहिल्यांदा अहंकाराला हरवले होते, आता पुन्हा तुमच्या अहंकाराला हरवू असे गांधी म्हणालेत. तसेच कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या मागितलेल्या माफीचा अपमान केला असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तर तोमर यांच्या विधानाने तीन शेतकरी विरोधी कृषी कायदे परत आणण्याचे षडयंत्र उघड केले आहे. कृषीमंत्र्यांच्या वक्तव्याने मोदी सरकारचे शेतकरी विरोधी कारस्थान आणि चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर मोदी सरकार पुन्हा एकदा तीन काळे शेतकरी विरोधी कायदे नव्या स्वरूपात आणण्याचा कट रचत असून भांडवलदारांच्या दबावाखाली ते करत असल्याची टीक काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: