ट्रक अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न, कटात जयंत पाटलांसह एसपीही सहभागी; पडळकरांचा आरोप
Gopichand Padalkar : नोव्हेंबर महिन्यात झालेला हल्ला हा सुनियोजित असल्याचे सांगत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर आरोप केला आहे.
BJP Leader Gopichand Padalkar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी वैयक्तिक सुरक्षा रक्षक (बॉडीगार्ड) न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबर महिन्यात आटपाडीत झालेली शिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून झालेला हा हल्ला सुनियोजित कट होता असा दावाही पडळकर यांनी केला. गोपीचंद पडळकर यांनी पोलीस प्रशासन आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.
गोपीचंद पडळकर यांनी म्हटले की, या हल्ल्याच्या कटात जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालक मंत्री जयंत पाटील पूर्णपणे सामिल आहेत. त्यांनी या कारवाईच्या नावाखाली माझ्या बॅाडीगार्डलाच निलंबित केले असून उलट माझ्यावरच ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक्षक आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्यावरील विश्वास उडाला असल्याचे पडळकर यांनी म्हटले. पडळकर यांनी एक व्हिडिओ शेअर करून आरोप केले आहेत.
आमदार पडळकर यांनी आता बॉडीगार्ड न स्वीकारण्याचा निर्णय जाहीर केला आहे. रक्षकच जर भक्षकात सामील असतील तर त्यांच्यावरती कसा विश्वास ठेवायचा असे म्हणत त्यांनी सांगली पोलीस अधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
ट्रक अंगावर घालायचा कट
माझी गाडी ज्या दिशेने येत होती. त्याच्या दुसऱ्या बाजूने दोनशे लोकांचा जमाव लाठ्या-काठ्यांसह उभा होता. पहिल्यांदा माझ्या गाडीवर दगडं फेकायची मग माझ्या गाडीचा वेग कमी होताच भरधाव वेगाने ट्रक अंगावर घालायचा. मग जमावाकडून हल्ला करवून घ्यायचा असा सुनियोजित हा कट आखला होता. आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व हल्ल्याच चित्रीकरण करताना पाहायला मिळतात. हा सगळा कट पोलीसांच्या संरक्षणात घडवून आणला जातोय. ही घटना थांबविण्यापेक्षा चित्रिकरणात मग्न होते असा आरोप पडळकर यांनी केला.
काय आहे प्रकरण ?
सांगली जिल्हा बँकेच्या निवडणूक वादातून आटपाडीत आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. यात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीसह त्याच्या ताफ्यातील काही गाड्या फोडल्या होत्या. तर राष्ट्रवादीचे युवक प्रदेश सरचिटणीस राजू जानकर यांचा पाय मोडला होता. पडळकर यांच्या गाडीने आपल्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप राजू जानकर यांनी केला होता. आटपाडी पोलीस स्टेशन जवळील साठे चौकात ही घटना घडली होती. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ठरावावरून हा वाद सुरू झाला होता आणि त्याचें पर्यवसन शिवीगाळपर्यंत गेले होते.