पुलवामा हल्ल्यानंतर नौदलही सज्ज, अरबी समुद्रात युद्धनौका सज्ज
नौदलाच्या जवळपास 60 युद्धनौका तसेच कोस्टगार्डच्या 12 युद्धनौका आणि जवळपास 80 विमानं अरबी समुद्रात तैनात करण्यात आले आहेत.
मुंबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये दिवसेंदिवस तणाव वाढत चालला आहे. दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर नौदलानं अरबी समुद्रात उत्तरेकडे विमानवाहक युद्धनौका आयएनएस विक्रमादित्य, आण्विक पाणबुडी चक्र, 60 युद्धनौका आणि जवळपास 80 विमानं तैनात केली आहेत. नौसेनेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.
नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नौदलाचा सुरुवातीपासूनच याठिकाणी अभ्यास सुरु होता. मात्र पुलवामा हल्ल्यानंतर युद्धनौका अभ्यासाऐवजी कारवाईसाठी तैनात करण्यात आल्या आहेत. नौदलाच्या जवळपास 60 युद्धनौका तसेच कोस्टगार्डच्या 12 युद्धनौका आणि जवळपास 80 विमानं तैनात करण्यात आले आहेत.
नौदल ट्रॉपिक्स अभ्यासात व्यक्त आहे. या अभ्यासामुळे पाकिस्तानच्या कुरापतींवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे, अशी माहिती नौदल अधिकाऱ्यांनी दिली. भारताची जमीन, समुद्र आणि हवाई यंत्रणा शक्तिशाली असल्याने अद्याप पाकिस्तानच्या नौदलाला भारतविरोधी हालचाली करता येणं शक्य झालेलं नाही.
नौदल प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा सोमवारी कोच्ची नौदल बेसमध्ये ट्रॉपिक्सच्या निकालाचं परीक्षण करतील. तसेच लांबा भारतीय नौदलाच्या तयारीची माहितीही घेणार आहेत.