Tahawwur Rana: 15 वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर 26/11च्या हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा भारताच्या ताब्यात, पाकिस्तान म्हणतो, 'तो आमचा....!'
Tahawwur Rana: तहव्वूर राणाबाबात पाकिस्तानने देखील प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शफाकत अली खान यांनी काल (गुरुवारी) याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई: मुंबईवर झालेल्या 26/11च्या हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा (Tahawwur Rana) याच अमेरिकेतून काल (गुरुवारी) भारतात प्रत्यार्पण करण्यात आलं आहे. यासंदर्भात 2010 पासून म्हणजेच गेल्या 15 वर्षांपासून भारताकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना यश आलं आहे. राणाला (Tahawwur Rana) घेऊन आलेले अमेरिकेचे गल्फस्ट्रीम जी 550 हे विमान दिल्लीच्या पालम टेक्निकल एअरपोर्टवर उतरलं. तिथून त्याला थेट एनआयएच्या कार्यालयात नेऊन नंतर पतियाळा हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले. दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईतर केलेल्या हल्ल्यात 166 जणांचा मृत्यू झाला होता. त्यात अमेरिकेसह आणखी काही देशांचेही नागरिक होते. आता राणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. दरम्यान तहव्वूर राणाबाबात पाकिस्तानने देखील प्रतिक्रिया दिली आहे. (Tahawwur Rana)
'तो आमचा नव्हेच....!'
मुंबईतील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा याच्याशी आमचा काहीही संबंध नाही, असे काल (गुरुवारी) पाकिस्तानने स्पष्ट केलं आहे. तो कॅनडाचा नागरिक आहे. पाकिस्तानातील कोणत्याही गोष्टींसंदर्भातील कागदपत्रांचे त्याने गेल्या दोन दशकांमध्ये नूतनीकरण केलेले नाही, असा दावा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शफाकत अली खान यांनी काल (गुरुवारी) केला आहे.
हल्ल्याच्या दिवशी भारतीय शिष्टमंडळ पाकिस्तानात चर्चा करत होते
मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी रात्री दहशतवादी हल्ला झाला होता, त्या दिवशी दिवसभर तत्कालीन केंद्रीय गृहसचिव मधुकर गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये दहशतवादासह विविध विषयांवर द्विपक्षीय चर्चा करत होते. भारतीय शिष्टमंडळाने 26 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी चर्चा पूर्ण केली. त्यानंतर ते पाकिस्तानी गृहमंत्र्यांची भेट घेणार होते.
तहव्वूर राणाला भारतात आणलं आता पुढे काय?
राणाला दिल्लीत आणल्याने तिथे कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली. राणाला आणण्यासाठी एनआयए व रॉ यांच्या अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक अमेरिकेला रवाना झाले होते. भारतात आणल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याची माहिती एनआयएने दिली आहे. भारत-अमेरिकेत झालेल्या प्रत्यार्पण करारांतर्गत राणाला अमेरिकेतील न्यायालयीन कोठडीत ठेवले होते. त्याने प्रत्यार्पण टाळण्यासाठी सर्व कायदेशीर पर्याय वापरले; पण अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली,आता त्याची चौकशी केली जाईल अशी माहिती आहे.
कोण आहे तहव्वूर राणा?
1961 मध्ये पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या तहव्वूर राणाने सुरुवातीला पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर म्हणून काम केले आणि नंतर 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात तो कॅनडाला गेले. कॅनेडियन नागरिकत्व मिळाल्यानंतर, तो शिकागो येथे स्थायिक झाला, जिथे तो इमिग्रेशन कन्सल्टन्सीसह विविध व्यवसाय चालवत होता.2009 मध्ये, राणाला 2008 च्या मुंबई हल्ल्यात सहभागी असल्याबद्दल अटक करण्यात आली होती, ज्यामध्ये 160 हून अधिक लोक मारले गेले होते. प्रेषित मुहम्मदचे वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित करणाऱ्या जिलँड्स-पोस्टेनवरील हल्ल्याच्या प्रयत्नाशीही त्याचा संबंध होता. राणावर 12 गुन्ह्यांचा आरोप होता, ज्यामध्ये अमेरिकन नागरिकांच्या हत्येला मदत करणे आणि प्रोत्साहन देणे यांचा समावेश होता.























