(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लॉकडाऊनदरम्यान दुकान उघडं पाहून अप्पर जिल्हाधिकाऱ्याला राग अनावर, दुकानदाराच्या लगावली कानशिलात; व्हिडीओ व्हायरल
कोरोना कर्फ्यू दरम्यान दुकान उघडल्याचे पाहून शाजापूरच्या अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा राय यांना संताप अनावर झाला आणि त्यांनी दुकानदाराला कानशिलात लगावली.
भोपाळ : एका युवकाला कानशिलात लगावत त्याला पोलिसांकडून मारहाण करणाऱ्या छत्तीसगडच्या सुरजपूरचे जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांचं तात्काळ निलंबन करावं असा आदेश मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिले होते. कालचं हे प्रकरण ताजं असतानाच मध्य प्रदेशमध्येही उच्चपदस्थ अधिकारी महिलने एका दुकानदाराच्या कानशिलाच लगावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला प्रशासकीय अधिकारी दुकानदाराला चापट मारताना दिसत आहे. कोरोना कर्फ्यू दरम्यान या दुकानदाराने आपले दुकान उघडल्याचे सांगितले जात आहे. दुकान उघडे पाहून शाजापूरच्या अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा राय यांना संताप अनावर झाला आणि त्यांनी दुकानदाराला कानशिलात मारली.
MP: In a viral video, Shahajpur ADM was seen slapping a footwear shopkeeper, during the sealing of shops as a part of following #COVID19 lockdown guidelines
— ANI (@ANI) May 24, 2021
Shopkeeper says, "The shutter was down, still Policemen pulled it up. ADM slapped me & Policeman even hit me with stick." pic.twitter.com/r1twTEn4nt
ज्या दुकानदाराला मारहाण करण्यात आली त्याने दावा केला आहे की, त्याच्या दुकानाचे शटर बंद होते. असे असूनही पोलिस कर्मचाऱ्याने त्याला दुकानातून बाहेर काढले. एडीएम (अप्पर जिल्हाधिकारी) यांनी मला मारहाण केली आणि पोलिसाने मला काठीने मारले. या प्रकरणात कॅबिनेट मंत्री इंदरसिंग परमार यांनी सांगितले की, मला घटनेची माहिती मिळाली आहे. एडीएम यांची वागणूक नीट नाही. गरज भासल्यास आम्ही संबंधित महिला आधिकाऱ्यावर कारवाई करु.
कालच छत्तीसगडच्या सुरजपूर जिल्ह्यामध्ये औषधं आणण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांनी मोबाईल फोडून त्याला कानशिलात लावली आणि नंतर त्याला पोलिसांकडून मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात होती. त्यानंतर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी जिल्हाधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली. सुरजपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या या कृत्यावर आयएएस असोसिएशनने देखील नाराजी व्यक्त केली होती.