MP Bus Accident : मध्य प्रदेशात बस पलटून भीषण अपघात, 41 जण जखमी, एकाचा मृत्यू
MP Bus Accident : इंदूरहून जोधपूरला जाणारी बस अनियंत्रित झाल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 41 प्रवासी जखमी झाले असून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Accident in Ratlam : मध्य प्रदेशातील इंदूर येथून राजस्थानकडे रवाना झालेल्या बसचा रतलाम जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक ट्रॅव्हल्स मंदसौरची टुरिस्ट बस RJ09 PA 5693 सोमवारी पहाटे 4 वाजता रतलाम जिल्ह्यातील जावरा तालुक्यातील धोधरजवळील रिछा गावातील चांदा ढाब्यासमोर उलटली. या अपघातात एका मुलाचा मृत्यू झाला, तर बसमधील 41 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. सर्व जखमींना जावना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या सहा जणांना रतलाम जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, अपघातावेळी बस ओव्हरलोड होती अशी माहिती समोर येत आहे. बसमध्ये सामान जास्त होते, असं सांगण्यात येत आहे. रविवारी रात्री बस इंदूरहून जोधपूरकडे रवाना झाली. यादरम्यान धोधरजवळील रूपनगर इथे बस अनियंत्रित झाल्याने उलटली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्जैनहून जोधपूरला जाण्यासाठी 20 मजूर बसमध्ये चढले होते. अपघाताची माहिती मिळताच जावरा एसडीएम हिमांशू प्रजापती, जावरा नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी व्ही. डी. जोशी, धोधर पोलीस स्टेशनचे एसआय जगदीश कुमावत घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. उपस्थित लोकांनी जखमींना बसमधून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं.
बसमधील प्रवाशांनी सांगितले की, बस चालकाने जावरा जवळील ढाब्यावर जेवण केले. तिथून बस जोधपूरकडे निघाली. त्यानंतर बस धोधरजवळील रुपनगर फांते इथं ढाब्याजवळ उभ्या असलेल्या वाहनांना धडक देत बस मोठ्या झाडावर आदळल्याने बस पलटी झाली. अपघाताच्या वेळी बसचा वेग सुमारे 100 ते 120 किमी होता. बस उलटली तेव्हा बहुतांश प्रवासी झोपले होते. अपघातानंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. बस सरळ करण्यासाठी घटनास्थळी क्रेन मागवण्यात आली.
महत्त्वाच्या इतर बातम्या