Belgaum news : रयत संघटनेचा ऊसाला प्रतिटन 5500 दरासाठी सुवर्ण विधानसौधला घेराव घालण्याचा प्रयत्न; पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक
रयत संघटनेनं बेळगावमध्ये ऊसाला प्रतिटन 5500 दर मिळण्यासाठी सुवर्ण विधानसौधला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी घेराव घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केली व नंतर सुटका करण्यात आली.
Belgaum news : रयत संघटनेनं आज बेळगावमध्ये ऊसाला प्रतिटन 5500 दर मिळण्यासाठी सुवर्ण विधानसौधला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी घेराव घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केली व नंतर सुटका करण्यात आली. यावेळी पोलिस आणि आंदोलनकर्ते शेतकरी यांच्यात शाब्दिक चकमक आणि बाचाबाची झाली.
गेल्या पंधरा दिवसांपासून शेतकरी उसाला प्रती टन 5 हजार 500 रूपये दर मिळावा, या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. गळीत हंगाम सुरू झाला, तरी उसाचा दर जाहीर केला जात नसल्याने शेतकरी संघटनांनी आंदोलन करत आहेत. काही दिवसांपूर्वी कर्नाटकच्या साखर मंत्र्यांनी मध्यस्थी करून आंदोलन मागे घ्यायला लावले होते, पण नंतर काहीच निर्णय झाला नसल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलन सुरू केले आहे.
आज सुवर्ण विधानसौधसमोर शेतकऱ्यांनी आंदोलन करून सुवर्ण विधानसौधला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांना बळाचा वापर करून अटक केली. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी उसाला दर मिळाला पाहिजे, शेतकरी विरोधी सरकारचा निषेध असो,साखर मंत्र्यांचा निषेध असो,जय जवान जय किसान अशा घोषणा दिल्या.
विधानसौधच्या दिशेने शेतकरी मोर्चा घेऊन येणार असल्याची कल्पना असल्याने निपाणी पोलिसांना याबाबत कल्पना देण्यात आली होती. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेराव घालण्याच्या इराद्याने बेळगावच्या दिशेने कूच झाल्यानंतर त्यांना पोलिसांकडून हत्तरगी टोलनाक्यावर अडवण्यात आले. यावेळी चांगलीच झटापट झाली. यावेळी काही शेतकऱ्यांनी अर्धनग्न होत शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी केली.
पोलिसांनी आजचा घेराव घालण्याचा प्रयत्न हाणून पाडल्यानंतरही रयत संघटनेने ठाम भूमिका घेताना प्रत्येक गावामध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या