22nd August In History: ब्रिटिशांकडून मद्रास शहराची स्थापना, गांधीजींचा विदेशी कपड्यांची होळी करत स्वदेशीचा नारा; आज इतिहासात
22nd August Important Events : कोल्हापूरच्या राही सरनोबतने 2018 सालच्या आशियायी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच महिला नेमबाज ठरली.
22nd August In History: इतिहासात आजचा दिवस हा अनेक अर्थाने भारतासाठी महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी मद्रास म्हणजे आताच्या चेन्नई शहराची स्थापना करण्यात आली होती. तर भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्येही आजच्या दिवसाला मोठं महत्व आहे. आजच्या दिवशी महात्मा गांधींनी विदेशी कपड्यांची होळी केली आणि स्वदेशीचा नारा दिला. भारतीय खेळासाठीही आजचा दिवस महत्त्वाचा असून नेमबाज राही सरनोबतने आशियायी क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत सुवर्णपदक मिळालं. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच महिला नेमबाज ठरली.
देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 22 ऑगस्ट या दिवशी घडलेल्या इतर महत्त्वाच्या घटनांचा क्रमवार तपशील पुढीलप्रमाणे,
1320: घियासुद्दीन तुघलक (गाझी मलिक) यांनी खिलजी घराण्याचा शेवटचा शासक नसिरुद्दीन खुसरो याला पराभूत केलं.
1639 : ब्रिटिशांनी मद्रास शहराची स्थापना केली
तामिळनाडूची राजधानी मद्रास आता चेन्नई म्हणून ओळखली जाते. मद्रास म्हणजेच चेन्नईच्या (Chennai) स्थापनेला आज 384 वर्षे झाले. या दिवशी म्हणजे 22 ऑगस्ट 1639 रोजी, मद्रास शहराची स्थापना झाली. या दिवशी ईस्ट इंडिया कंपनीने फोर्ट सेंट जॉर्जच्या बांधकामासाठी स्थानिक राज्यकर्त्यांकडून जमीन खरेदी करून आधुनिक शहराचा पाया घातला. 22 ऑगस्ट 1639 रोजी सेंट फोर्ट जॉर्जच्या बांधकामाने आधुनिक मद्रास अस्तित्वात आले. जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने (East India Company) विजयनगर साम्राज्याकडून जमीन विकत घेतली आणि या शहराची पायाभरणी केली. दरवर्षी 22 ऑगस्ट हा मद्रास दिन (Madras Day) म्हणून साजरा केला जातो.
1848: अमेरिकेने न्यू मेक्सिको ताब्यात घेतलं.
1921 : महात्मा गांधींनी विदेशी कपड्यावर बहिष्कार टाकून होळी केली
भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये आजच्या दिवशी घडलेल्या घटनेला मोठं महत्व आहे. ब्रिटिशांविरोधात सर्व स्तरावर लढाई लढण्यासाठी महात्मा गांधींनी (Mahatma Gandhi) 22 ऑगस्ट 1921 रोजी विदेशी कपड्यावर बहिष्कार टाकण्याचं भारतीयांना आवाहन केलं. आजच्या दिवशी गांधीजींनी विदेशी कपड्यांची होळी केली आणि स्वदेशीचा (Swadeshi) नारा दिला. गांधीजींच्या आवाहनानंतर भारतातील कोट्यवधी लोकांनी विदेशी कपड्यांवर बहिष्कार टाकून खादीचे कपडे परिधान करण्यास सुरुवात केली. गांधीजींच्या या लढ्यामुळे ब्रिटिशांच्या व्यापाराला मोठा धक्का बसला आणि पुढच्याच वर्षी ब्रिटनवरून आयात होणाऱ्या तयार कपड्यामध्ये मोठी घट झाली.
1922: जनरल मायकेल कॉलिन्स यांची पश्चिम कॉर्कमध्ये हत्या करण्यात आली.
1944: अमेरिका, ब्रिटन, रशिया आणि चीनच्या प्रतिनिधींनी संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेसाठी योजना तयार करण्यासाठी बैठक घेतली.
1969: अमेरिकेतील समुद्री वादळात 255 लोकांचा मृत्यू झाला.
2007: इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या कामगारांसाठी, दोन आठवड्यांचे मिशन स्पेस व्हेइकल एंडेव्हर फ्लोरिडा केनेडी स्पेस सेंटरमध्ये सुरक्षितपणे उतरले.
2007: इजिप्शियन पुरातत्वशास्त्रज्ञांना पश्चिम वाळवंटातील सिवा प्रदेशात सुमारे 20 दशलक्ष वर्षे जुने मानवी पाऊलखुणा सापडले.
2014 : ज्ञानपीठ पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय कन्नड भाषिक लेखक, साहित्यिक, समीक्षक आणि शिक्षणतज्ञ यू. आर. अनंतमूर्ती यांचे निधन.
2018: कोल्हापुरच्या राही सरनोबतला 25 मीटर पिस्तुल नेमबाजीत सुवर्णपदक मिळालं. आशियाई खेळ नेमबाजीत सुवर्णपदक जिंकणारी पहिली ती भारतीय महिला ठरली.