Bihar News : बिहारमध्ये कोरोनामुळे 10 वर्षाच्या मुलीचा मृत्यू, वैद्यकीय महाविद्यालयात सुरु होते उपचार
Bihar News : बिहारमधील एका मुलीची प्रकृती खालावल्याने तिला नारायण मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. कोरोनाचे निदान झाल्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
मुंबई : बिहारमधील (Bihar) सासाराममध्ये कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) असलेल्या 10 वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सासारामचे सिव्हिल सर्जन डॉ. केएन तिवारी यांनी मुलीच्या मृत्यूविषयी माहिती दिली. बिहारमधील लिलारी, नोखा येथे राहणारी ही मुलगी होती. या मुलीवर देहरीच्या जमुहर येथील नारायण मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.या घटनेमुळे आरोग्यविभागात एकच खळबळ माजल्याचं पाहायला मिळालं.
कोरोनाची चाचणी करण्यासाठी नमुना पाटण्याला पाठवण्यात आला सिव्हिल सर्जनने सांगितले की, मुलगी गयाच्या शेरघाटी येथे एका नातेवाईकाला भेटायला गेली होती. तिथेच तिची तब्येत बिघडू लागली आणि त्यानंतर तिला जमुहरच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तपासणी केली असता तिचा कोरोनाचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांनी तात्काळ तिच्यावर उपचार केले पंरतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पण कोरोनाच्या कोणत्या व्हेरियंटमुळे तिचा मृत्यू झाला याची चाचणी करण्यासाठी नमुना पाटणा येथे पाठवण्यात आलाय.या नमुन्याचे निकाल आल्यानंतर तिच्या मृत्यूबाबत खुलासा करण्यात येईल.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क
ही मुलगी ज्या गावात राहणार होती तेथे वैद्यकीय पथक पाठवण्यात आले असल्याची माहिती देखील यावेळी आरोग्य विभागाने दिली. तसेच त्या गावामध्ये कोविड चाचणी देखील घेण्यात आलीये. परंतु इतर कोणीही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले नसल्याचं सांगण्यात आलं आहे. संपूर्ण खबरदारी घेतली जात असून आरोग्य विभाग पूर्णपणे सतर्क झाले असल्याची माहिती देण्यात आलीये.
भारतात सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून देशामध्ये मागील 24 तासांमध्ये कोविड-19 चे 841 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तसेच रविवार 31 डिसेंबर रोजी एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ही 4,309 इतकी झाली आहे.
राज्यातही कोरोना रुग्णसंख्येत वाढ
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत (Coronavirus Cases) वाढ होत आहे. आजही रविवारी, 31 डिसेंबर रोजी राज्यात 131 नवीन कोरोनाबाधित (Coronavirus Infected) आढळले आहेत. त्यामुळे आता राज्यात सक्रिय कोरोनाबाधितांचा आकडा 701 वर पोहचला आहे. तर, कोरोनाचा नवा व्हेरिएंट जेएन.1 (Coronavirus JN.1 Infection) बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. या व्हेरिएंटचे 29 रुग्ण झाले आहेत.