1 January In History : भीमा कोरेगावची लढाई, फुले दाम्पत्याने पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली; आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं...
Dinvishesh : 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यामध्ये भिडे यांच्या वाड्यात महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली.
![1 January In History : भीमा कोरेगावची लढाई, फुले दाम्पत्याने पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली; आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं... 1 january in history dinvishesh Mahatma Jyotiba Phule And Savitribai Phule start first girls school in pune Bhima Koregan nana patekar birthday latest news 1 January In History : भीमा कोरेगावची लढाई, फुले दाम्पत्याने पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली; आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/01/1f6c8f220321bb5f287c08563d90f52a1672511653919328_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
On This Day In History : नवीन वर्षात जल्लोषाचे वातावरण आहे, पण वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक दुःखद घटनेचीही इतिहासात नोंद आहे. 1978 मध्ये आजच्या दिवशी 213 प्रवाशांसह एअर इंडियाचे विमान समुद्रात बुडाले. सम्राट अशोक नावाचे हे बोईंग 747 विमान मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणात यांत्रिक बिघाडामुळे क्रॅश झाले होते. विमानात 190 प्रवासी आणि 23 क्रू मेंबर्स होते. घटनेनंतर लगेचच हा कटाचा भाग असावा असा संशय व्यक्त केला जात होता. परंतु समुद्रात सापडलेल्या विमानाच्या अवशेषाच्या तपासणीत हा अपघात असल्याचे सिद्ध झाले. याबरोबरच 1 जानेवारी 1818 रोजी भीमा कोरेगावची लढाई झाली होती. याशिवाय आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.
1664 : सुरतेच्या लुटीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सुरतमध्ये दाखल झाले (Chhatrapati Shivaji Maharaj)
मोगल सरदार शाहिस्तेखान सलग तीन वर्षे महाराष्ट्रात तळ ठोकून होता. त्यादरम्यान मराठा साम्राज्याला मिळणारा महसूल कमी होऊन राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झाली होती. त्याला पुण्यातून हुसकावून लावल्यानंतर राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी गुजरातमधील सुरत शहर सुरत शहर लुटण्याची योजना छत्रपती शिवाजी महाराजांनी आखली. सुरतेतील आर्थिक आणि भोवतीच्या सैनिकी हालचालींवर नजर ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपला मुख्य हेर बहिर्जी नाईक याची नेमणूक केली. सुरतेची बित्तंबातमी काढून बहिर्जीने शिवाजी महाराजांची भेट घेतली व सुरतेवर हल्ला केला असता मोठा खजिना हातात येईल असे सांगितले. यावर मसलत करून महाराजांनी सुरतेवर चाल करून जाण्याचा बेत रचला. त्यासाठी 1 जानेवारी 1664 रोजी शिवाजी महाराज सुरतमध्ये दाखल झाले. त्यानंतर 5 जानेवारी 1664 रोजी आपल्या घोडदळासह सूरतेत थडकून शिवाजी महाराजांनी आपली मोहीम यशस्वी केली होती.
1862 : भारतीय दंड संहिता आणि फौजदारी प्रक्रिया संहिता लागू करण्यात आली
आजच्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी 1862 रोजी भारतीय दंड संहिता आणि फौजदारी प्रक्रिया संहिता लागू करण्यात आली. त्याआधी 6 ऑक्टोबर 1860 रोजी त्याला मान्यता देण्यात आली होती. आयपीसी म्हणून प्रसिद्ध भारतीय दंड संहिता हा भारताचा प्राथमिक गुन्हेगारी कायदा आहे, जो गुन्हेगारी कायद्यातील प्रत्येक भौतिक बाबी विचारात घेतो. 1862 पासून या कायद्यात बर्याच वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे. हे देशातील सर्व संभाव्य गुन्हे आणि त्यांच्याशी संबंधित शिक्षेची व्याख्या करते.
1818 : भीमा कोरेगावची लढाई (Bhima Koregan)
1 जानेवारी 1818 रोजी भीमा कोरेगावची लढाई झाली होती. बाजीराव पेशवा (दुसरे) आणि दुसऱ्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री बटालियन यांच्यात लढाई झाली होती. या लढाईत ब्रिटीशांचा विजय आणि मराठ्यांचा पराभव झाला. इंग्रजांच्या सैन्यात सर्वच जाती - धर्माचे भारतीय सैनिक लढत होते. मात्र त्यामध्ये महार सैनिकांची संख्या मोठी होती. या लढाईचे महत्व इंग्रजांची सत्ता महाराष्ट्रात स्थापन होण्यात किती आहे हे जाऊन इंग्रजांनी भीमा नदीच्या काठावर या लढाईत शाहिद झालेल्या सैनिकांच्या स्मुर्तीप्रित्यर्थय विजय स्तंभ उभारला. या स्थंभावर सर्वच जातीधर्मातील सैनिकांची नावे पाहायला मिळतात ज्यामध्ये महार सैनिकांचे प्रमाण मोठे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1 जानेवारी 1927 ला या विजयस्तंभाला भेट दिली. महार समाजामध्ये या पराक्रमाच्या माध्यमातून जागृती व्हावी आणि इंग्रजांच्या सैन्यामध्ये महार रेजिमेंट नव्याने सुरु व्हावी या डॉक्टर आंबेडकरांचा या भेटीमागचा उद्देश होता . त्यानंतर आंबेडकरी समाजाकडून प्रत्येक वर्षी एक जानेवारीला कोरेगाव भीमा या ठिकाणी विजय दिन साजरा करण्यास सुरुवात झाली .
1848 : महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाडा पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरु केली ( Mahatma Jyotiba Phule And Savitribai Phule)
महात्मा जोतीबा फुले यांनी अहमदनगरमध्ये ख्रिस्ती मिशनरीं मार्फत चालवल्या जाणाऱ्या मुलींच्या शाळेला भेट दिली. त्यानंतर त्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यामध्ये भिडे यांच्या वाडयात मुलींची पहिली शाळा सुरू केली. तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. तेव्हापासून भारतातील प्रथम महिला शिक्षिका म्हणून सावित्राबाई फुलेंचे नाव घेतले जाते.
1932 : सकाळ वृत्तपत्राची सुरूवात (Sakal paper)
अमेरिकेत पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण करून आलेल्या डॉ. नारायण परुळेकर यांनी 1 जानेवारी 1932 रोजी पुण्यातून सकाळ वृत्तपत्र सुरू केले. सकाळ वर्तमानपत्र हे "सकाळ मिडिया ग्रुप" च्या मालकीचे असून हा मिडिया ग्रुप सध्या प्रतापराव पवार यांच्या मालकीचा आहे.
1951 : अभिनेते नाना पाटेकर यांचा वाढदिवस (Nana Patekar)
अभिनेते नाना पाटेकर यांचा जन्म मुरुड-जंजिरा ( जि. रायगड ) येथे झाला. नाना पाटेकर हे भारतीय चित्रपटांचे सुप्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांच्या अभिनयामुळे त्यांनी खूप कमी वेळात आपली लोकप्रियता वाढवली आहे. हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त नाना पाटेकरांनी अनेक मराठी, तामिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही आपला काम केले आहे. याव्यतिरिक्त त्यांनी सामाजिक कार्यातही सहभाग घेतलेला आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. पद्मश्री आणि राष्ट्रीय चित्रपट या मानाच्या पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले.
1959 : क्यूबाचा हुकूमशहा फ्लुजेन्सियो बतिस्ता यांचा पाडाव
फिडेल कॅस्ट्रोच्या नेतृत्वाखालील विद्रोही सैनिकांनी क्यूबाचा हुकूमशहा फ्लुजेन्सियो बतिस्ता यांचा पाडाव केला आणि त्याला पळून जाण्यास भाग पाडले.
1978 : एअर इंडियाचे विमान समुद्रात कोसळले (Air India)
1978 मध्ये आजच्या दिवशी 213 प्रवाशांसह एअर इंडियाचे विमान समुद्रात बुडाले. सम्राट अशोक नावाचे हे बोईंग 747 विमान मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणात यांत्रिक बिघाडामुळे क्रॅश झाले होते. विमानात 190 प्रवासी आणि 23 क्रू मेंबर्स होते. घटनेनंतर लगेचच हा कटाचा भाग असावा असा संशय व्यक्त केला जात होता. परंतु समुद्रात सापडलेल्या विमानाच्या अवशेषाच्या तपासणीत हा अपघात असल्याचे सिद्ध झाले.
1984 : ब्रुनेईने ब्रिटनपासून स्वातंत्र्य घोषित केले
ब्रुनेई या छोट्या समृद्ध आशियाई देशाने ब्रिटनपासून स्वातंत्र्य घोषित केले. तेल आणि नैसर्गिक वायूच्या साठ्यांमधून हा देश दोन दशलक्ष लोकसंख्येचा हा देश दरवर्षी अब्जावधी डॉलर कमावतो. संपूर्ण आशियामध्ये या देशाचे दरडोई उत्पन्न सर्वाधिक आहे.
1992 : मुंबईत बनावट दारू पिल्याने 91 जणांचा मृत्यू
मुंबई येथे नव्या वर्षाचे स्वागत करताना बनावट दारू प्यायल्याने 91 जणांचा मृत्यू झाला होता.
2022 : जगातील सर्वात मोठा व्यापार गट तयार झाला
रिजनल कॉमप्रेहेंसीव इकनॉमिक पार्टनरशीप (Regional Comprehensive Economic Partnership) हा ऑस्ट्रेलिया, ब्रुनेई, कंबोडिया, चीन, इंडोनेशिया, जपान, दक्षिण कोरिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, न्यूझीलंड, फिलीपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम या आशिया-पॅसिफिक राष्ट्रांमधील मुक्त व्यापार करार असून, जगातील सर्वात मोठा व्यापार गट तयार झाला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)