Islampur Municipal Hall: तब्बल 36 वर्षांनी सभागृहात झळकल्या वसंतदादा पाटील, बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमा
Sangli: इस्लामपूर येथील नगरपालिकेच्या सभागृहात वसंदादांची प्रतिमा लावण्याचा ठराव यापूर्वी सन 1985 साली करण्यात आला होता.
Sangli: सांगलीच्या इस्लामपूर येथील नगरपालिकेच्या अण्णासाहेब डांगे सभागृहात (Islampur Municipal Hall) सत्ताधारी विकास आघाडी आणि शिवसेनेने राज्याचे चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषविलेले पद्मविभूषण वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) आणि हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या प्रतिमा लावत राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडवून दिली. 1985 पूर्वी जवळपास 30 वर्षे पवार पार्टीची एकहाती सत्ता होती. माजी नगराध्यक्ष स्व. एम.डी.पवार हे उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांचे मानस पुत्र म्हणून राजकीय क्षेत्रात ओळखले जात होते. तसेच त्यांचा वसंतदादा पाटील यांच्याशीही जवळकीचे नाते होते. त्यामुळे त्यांना शहर आणि तालुक्याच्या राजकारणात मोठा मान होता. तोपर्यंत वसंतदादांचे छायाचित्र सभागृहात होते.
1985 साली पवार पार्टीची मोठी वाताहत झाली.या निवडणुकीत अत्यंत एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागले. तत्कालीन नागरिक संघटनेने सत्ता मिळवली. त्यानंतर दादांची प्रतिमा गायब झाली. आज तब्बल 36 वर्षांनंतर विकास आघाडी- शिवसेनेने वसंतदादांची प्रतिमा कायमस्वरूपी राहील अशी व्यवस्था करत तिचे अनावरण केले. या सभागृहात यापूर्वी स्व. लोकनेते राजारामबापू पाटील व स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या दोन मोठ्या प्रतिमा पिठासीन अधिकाऱ्याच्या दोन्ही बाजूला लावण्यात आल्या होत्या.. तसेच दिवंगत नगराध्यक्षांची तैल चित्रेही सभागृहात लावण्यात आली आहेत.
याच सभागृहात वसंदादांची प्रतिमा लावण्याचा ठराव यापूर्वी सन 1985 साली करण्यात आला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झाली नव्हती. तर, विकास आघाडी व शिवसेनेची सत्ता आल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्याचा ठराव करण्यात आला होता. शिवसेनेचे गटनेते आनंदराव पवार यांनी हा ठराव मांडला होता. या ठरावांची सोमवारी अंमलबजावणी करत सत्ताकाळाच्या शेवटच्या दिवशी विकास आघाडी– शिवसेनेने या दोन्ही नेत्यांच्या प्रतिमा सभागृहात लावल्या.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha