(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Success Story : हिंगोली जिल्ह्यात करवंद शेतीचा यशस्वी प्रयोग, आठ एकरात 16 लाखांचं उत्पन्न अपेक्षित; कमी खर्चात अधिक नफा
हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील कांडली येथील एका शेतकऱ्याने करवंद शेतीचा (Karvand Farming) यशस्वी प्रयोग केला आहे.
Success Story : शेतकऱ्यांना सातत्यानं विविध संकटांचा सामना करावा लागतो. कधी आस्मनी तर कधी सुलतानी संकट येतं. या संकटाचा सामना करत काही शेतकरी आपल्या शेतात यशस्वी प्रयोग करत आहेत. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील कांडली येथील एका शेतकऱ्याने करवंद शेतीचा (Karvand Farming) यशस्वी प्रयोग केला आहे. या शेतकऱ्याला करवंद शेतीतून आठ एकरात 15 ते 16 लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. मधुकर पानपट्टे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. पाहुयात त्यांची यशोगाथा...
हलक्या जमिनीमध्ये करवंदाची लागवड करुन हिंगोलीच्या कांडली येथील शेतकरी मधुकर पानपट्टे हे लखपती झाले आहेत. दोन एकर क्षेत्रात त्यांनी करवंदाच्या बागेची लागवड केली होती. ती बाग आता 30 एकरपर्यंत वाढवली आहे. यातून त्यांना भरघोस नफा मिळत आहे.
फक्त करवंदाचे रोप खरेदी करण्यासाठीच खर्च
मधुकर पानपट्टे यांची स्वतःकडे असलेली शेती कसदार नसल्याने शेती करायची की नाही? असा प्रश्न त्यांना पडला होता. शेती करताना एक ना अनेक अडचणी त्यांना येत होत्या वन्य प्राण्यांच्या संकटाला सुद्धा तोंड द्यावे लागत होते. दरवर्षी हजारो रुपये खर्च करुनही चांगला मोबदला मिळत नसल्याने 12 वर्षांपूर्वी शेतकरी मधुकर पानपट्टे यांनी त्यांच्या शेतात प्रायोगिक तत्त्वावर दोन एकरमध्ये करवंदाच्या बागेची लागवड केली होती. लागवड केलेली ही बाग पुढील तीन वर्ष जोपासवी लागते. तिसऱ्या वर्षापासून करवंदाच्या बागेतून उत्पन्न निघायला सुरुवात होते. यातील विशेष बाब म्हणजे ही बाग लागवड करत असताना फक्त रोपटे खरेदी करण्यासाठीच पैसे लागतात. त्यानंतर कुठेही एकही रुपया खर्च करण्याची आवश्यकता नाही. कोणतीही खते किंवा औषधी फवारणीचा खर्च सुद्धा यासाठी लागत नाही. दोन एकरमधील करवंदाच्या बागेतून पहिल्या वर्षी दोन लाख रुपयाचे उत्पन्न झाल्याचे शेतकरी मधुकर पानपट्टे यांनी सांगितले.
करवंदाला मोठ्या प्रमाणावर मागणी
करवंदापासून जेली, जाम, चेरी त्याचबरोबर प्रक्रिया करुन हे करवंद कलकत्ता पानाच्या विड्यात देखील खायला दिले जाते. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर करवंदाला मागणी असते. एकाही रुपयाचा खर्च न करता कोणत्याही जनावरांचा किंवा वन्य प्राण्यांचा त्रास नसताना चांगल्या पद्धतीने उत्पन्न निघत आहे. त्याचबरोबर करवंदाची झाडे ही काटेरी झाडे असल्यामुळं कमी प्रमाणात पाणी असलं तरीही हे चांगल्या पद्धतीने उत्पन्न देते. या सर्व गोष्टी लक्षात आल्यानंतर शेतकरी मधुकर पानपट्टे यांनी त्यांच्याकडे असलेल्या इतर शेतीमध्ये सुद्धा करवंदाची लागवड करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यासाठी लागणाऱ्या रोपट्यांची निर्मिती मधुकर पानपट्टे स्वतः करत असतात. पानपट्टे यांनी आता तब्बल 30 एकरमध्ये करवंदाच्या बागेची लागवड केली आहे. यापैकी आठ एकरमध्ये करवंदाच्या बागेतील उत्पन्न तोडणीस आले आहे. यामधून शेतकरी पानपट्टे यांना तब्बल 15 ते 16 लाख रुपयांचा फायदा होईल असे शेतकरी सांगत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: