जरांगेंकडून पोलखोल, प्रशासन लागलं कामाला; हिंगोलीत दोन दिवसांत 223 कुणबी प्रमाणपत्राचे वाटप
Kunbi Certificate : प्रशासन कामाला लागल्याचे पाहायला मिळत असून, विशेष मोहीम राबवत हिंगोलीत (Hingoli) दोन दिवसांत 223 कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे.
हिंगोली : विभागीय आयुक्तांनी आदेश काढून देखील मराठवाड्यात (Marathwada) कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) वाटप केले जात नसल्याचे आरोप मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केले होते. तसेच, सरकारच्या शिष्टमंडळ आणि बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यासमोरच वेगवेगळ्या गावात फोन लावून प्रशासनाच्या दाव्याची पोलखोल केली होती. त्यामुळे बच्चू कडू देखील प्रशासकीय अधिकाऱ्यांवर संतापले होते. त्यानंतर आता प्रशासन कामाला लागल्याचे पाहायला मिळत असून, विशेष मोहीम राबवत हिंगोलीत (Hingoli) दोन दिवसांत 223 कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे.
हिंगोली जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा समाजातील पात्र व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यासाठी 17 व 18 जानेवारी रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील 223 लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले आहे. कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठाची जिल्ह्यातील 158 गावामध्ये नोंदी आढळून आलेल्या आहेत. या 158 गावातील 1310 लाभार्थ्यांना कोरे अर्ज नमुन्याचे वाटप करण्यात आले होते. यापैकी 565 जणांनी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी 223 जणांना जात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले आहे.
तालुकानिहाय तपशील..
हिंगोली तालुका...
- हिंगोली तालुक्यात 61 गावामध्ये कुणबी नोंदी आढळून आलेल्या आहेत.
- या 61 गावामध्ये 312 अर्जाचे वाटप करण्यात आले होते.
- त्यापैकी 27 जणांनी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे.
- त्यापैकी 08 जणांना जात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले आहे.
कळमनुरी तालुका
- कळमनुरी तालुक्यातील 23 गावामध्ये कुणबी नोंदी आढळून आलेल्या आहेत.
- या 23 गावामध्ये 75 अर्जाचे वाटप करण्यात आले होते.
- त्यापैकी 72 जणांनी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे.
- त्यापैकी 08 जणांना जात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले आहे.
वसमत तालुका
- वसमत तालुक्यातील 13 गावामध्ये कुणबी नोंदी आढळून आलेल्या आहेत.
- या 13 गावामध्ये 205 अर्जाचे वाटप करण्यात आले होते.
- त्यापैकी 65 जणांनी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे.
- त्यापैकी 21 जणांना जात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले आहे.
सेनगाव तालुका
- सेनगाव तालुक्यातील 43 गावामध्ये कुणबी नोंदी आढळून आलेल्या आहेत.
- या 43 गावामध्ये 410अर्जाचे वाटप करण्यात आले होते.
- त्यापैकी 196 जणांनी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे.
- त्यापैकी 11 जणांना जात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले आहे.
औंढा नागनाथ तालुका
- औंढा नागनाथ तालुक्यातील 18 गावामध्ये कुणबी नोंदी आढळून आलेल्या आहेत.
- या 18 गावामध्ये 308 अर्जाचे वाटप करण्यात आले होते.
- त्यापैकी 205 जणांनी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे.
- त्यापैकी 175 जणांना जात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 4 हजार 28 नोंदी आढळून आलेल्या आहेत
जिल्ह्यात आतापर्यंत कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठाच्या आतापर्यंत 4 हजार 28 नोंदी आढळून आलेल्या आहेत. यापैकी 3 हजार 975 नोंदीचे स्कॅनींग झालेले असून या सर्व नोंदीचे स्कॅनींग जिल्ह्याच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहे. तसेच या सर्व नोंदीची संबंधित गावामध्ये ग्रामपंचायत व तलाठी चावडीवर गाव प्रसिध्दी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा समाजातील पात्र लाभार्थींनी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करुन जात प्रमाणपत्र काढून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: