Hingoli News : चालकाच्या आले मना, भूक लागली म्हणून बस पुढे नेईना; पण भर उन्हात ताटकळावे लागले प्रवाशांना
Hingoli News : प्रवाशांना घेऊन निघालेली बस चालकाने भूक लागली म्हणून अचानक रस्त्यातच थांबवली.
Hingoli News : एसटी बसने (ST Bus) प्रवास करताना अनकेदा प्रवाशांना वाईट अनुभव येत असतो, असाच काही प्रकार हिंगोली जिल्ह्यात (Hingoli District) समोर आला आहे. कारण प्रवाशांना घेऊन निघालेली बस चालकाने भूक लागली म्हणून अचानक रस्त्यातच थांबवली. पुढे काही मिनिटांनी तब्येत बिघडल्याचे सांगत बस पुढे नेण्यास नकार दिला. हा प्रकार वसमत एस.टी आगारातून औंढा नागनाथकडे निघालेल्या बसमधील प्रवाशांसोबत घडला आहे. चालकाने चोंडी स्टेशननजीक एका झाडाखाली बस थांबवली आणि त्यानंतर पुढे नेण्यास नकार दिला. हा सर्व प्रकार 8 मे रोजी दुपारी 12 च्या सुमारास घडला. मात्र या प्रकारामुळे प्रवाशांना भर उन्हात ताटकळावे लागले, ज्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वसमत एस. टी. आगारातून औंढा नागनाथसाठी दररोज साडेअकरा वाजता बसफेरी सोडण्यात येते. दरम्यान नेहमीप्रमाणे 8 मे रोजी (MH 40 BL 2855) ही बस 50 ते 60 प्रवाशांना घेऊन वसमत आगारातून औंढ्याकडे निघाली. परंतु बस चोंडी स्टेशनजवळ येताच चालकाने रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाखाली बस थांबविली. अचानक बस थांबल्याने नेमकं काय झालं असा प्रश्न प्रवाशांना पडला. त्यामुळे काही बिघाड झाला असेल असे समजून प्रवाशांनी विचारपूस केली असता चालकाला भूक लागल्याचे वाहकाने सांगितले. त्यानंतर चालक जेवण करत असेल म्हणून प्रवाशांनी देखील काही वेळ धीर धरला.
दुसरी बस येऊ द्या त्यात बसवून देतो...
पण बस थांबवून अर्धा तास होऊन देखील चालक काही बस सुरु करायला तयार नव्हता. त्यामुळे प्रवाशांनी पुन्हा विचारपूस केली असता चालकाची तब्येत बिघडली असून, बस पुढे जाणार नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. तर दुसरी बस येऊ द्या त्यात बसवून देतो, असे वाहकाने प्रवाशांना सांगितले. भर उन्हात रस्त्यावर बस थांबविण्यात आल्याने प्रवासी महिला, लहान मुलांना ताटकळत थांबावे लागले. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
ड्युटीच्या रागातून हा प्रकार घडला असावा?
दरम्यान काही वेळांनी वसमतकडून एक बस आली. मात्र, त्यात प्रवाशांची गर्दी होती. त्यामुळे ताटकळलेल्या प्रवाशांना जागा मिळणे अवघड झाले. पण तरीही कसे बसे काही प्रवासी या बसमध्ये बसले. तर उर्वरित प्रवाशांना पुन्हा दुसऱ्या बसची प्रतीक्षा करावी लागली. या प्रकारावरून प्रवाशांत संताप व्यक्त होत होता. तर बसचा चालक आणि वाहकाची वसमत आगारातच वाहतूक निरीक्षकांशी ड्युटीवरून नाराजी व्यक्त होत होती. रात्रपाळीची बसफेरी करूनही पुन्हा दिवसाही ड्युटीवर पाठवण्यात येत असल्याच्या रागातून हा प्रकार घडला असावा, असा अंदाज प्रवासी लावत होते.
इतर महत्वाच्या बातम्या:
Beed News : बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा आई अन् मुलीसह एसटी बसद्वारे प्रवास