Hingoli Crime : बहिणीकडे का पाहतो, जाब विचारत हिंगोलीत तरुणाला बेदम मारहाण उपचारादरम्यान मृत्यू; 12 जणांविरोधात गुन्हा दाखल
बहिणीकडे का पाहतो आणि तिला मेसेज का पाठवतो या कारणावरुन तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हिंगोलीत काल ही धक्कादायक घटना घडली.
Hingoli Crime : बहिणीकडे का पाहतो आणि तिला मेसेज का पाठवतो या कारणावरुन तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हिंगोलीत (Hingoli) काल (17 मे) संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी 12 आरोपींच्या विरोधात वसमत शहर पोलिसात (Vasmat City Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओमकार हेरे असं मृत तरुणाचं नाव आहे. यश चाहड आणि त्याच्या साथीदारांनी ओमकार हेरे या तरुणाला मारहाण केली होती.
काय आहे प्रकरण?
वसमत शहरातील रवींद्रनाथ टागोर कॉलनीमध्ये ओमकार हेरे युवक राहत होता. या युवकाला यश चाहड आणि त्याच्या साथीदारांनी ओमकार हेरेला मोटर सायकलवर बसून नेत टाकळगाव शिवारामध्ये घेऊन गेले. माझ्या बहिणीकडे का बघतो आणि तिला मेसेज का करतो, असा जाब त्यांनी या ठिकाणी विचारण्यास सुरुवात केली. या कारणावरुन यश चहाड आणि त्याच्या इतर 12 साथीदारांनी ओमकार हेरे याला लोखंडी रॉड, लाठ्याकाठ्या आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत ओमकार केरे हा तरुण गंभीर जखमी झाला. यानंतर आरोपींनी त्याला वसमत शहरातील केंब्रिज महाविद्यालयाच्या परिसरात गंभीर जखमी अवस्थेत आणून टाकलं होतं.
ओमकारचा उपचारादरम्यान मृत्यू, 12 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल
त्यानंतर ओमकार हेरेला नांदेड इथल्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान ओमकारचा मृत्यू झाला. यानंतर आक्रमक झालेले ओमकार हेरेच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह थेट वसमत शहर पोलीस स्टेशनमध्ये आणला. जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली. पोलिसांच्या आश्वासनानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृत तरुणाच्या वडिलांच्या तक्रारीवरुन 12 आरोपींच्या विरोधात वसमत शहर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
पत्नी नांदायला येत नसल्याच्या कारणावरुन जावयाकडून सासूचा खून
काही दिवसांपूर्वी हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात जावयाने आपल्याच सासूची हत्या केल्याची घटना घडली होती. वसमत शहरातील झेंडा चौक भागात सोमवारी (8 मे) पहाटेच्या सुमारास ही घटना समोर आली. पत्नी नांदायला येत नाही या कारणावरुन जावई आणि सासूचे भांडण झाले. रागाच्या भरात जावयाने 75 वर्षीय सासूचे डोके जमिनीवर आपटून गंभीर जखमी केले. यता सासूचा जागीच मृत्यू झाला आहे. शेवंताबाई होणाजी वंजे असे मृत महिलेचं नाव असून, बाळासाहेब शिनगारे असं आरोपी जावयाचं नाव आहे. या प्रकरणी त्याच्याविरोधात वसमत शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा करण्यात आला आहे.