आमचं गाव, जमिनी अन् गुरं-ढोरं विकत घ्या; आर्थिक स्थितीला कंटाळलेल्या गारखेडा ग्रामस्थांचं पत्र
Hingoli : सातत्याने पडणाऱ्या अतिवृष्टीमुळे नुकसान होत असूनही प्रशासनाकडून काहीही मदत होत नसल्याने ग्रामस्थांनी गावच विकायला काढलं आहे.
हिंगोली : सातत्याची अतिवृष्टी आणि राज्य सरकारकडून कोणतीही मदत मिळत नसल्याने हिंगोली जिह्यातील गारखेडा हे गावच विक्रीला काढल्याचं ग्रामस्थांनी जाहीर केलं आहे. आर्थिक परिस्थितीला कंटाळून या गावातील सर्व घरं, शेतजमिनी, गुरं-ढोरं विक्रीला काढत असल्याचं एक पत्र ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलं आहे.
गेल्या तीन वर्षापासून अतिवृष्टीने शेतकरी आर्थिक संकटात आला आहे, कोणतीही मदत शेतकऱ्यांना मिळत नाही. पीक विमा भरूनही विम्याचा परतावा मिळत नाही, या वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तरीही सरकार लक्ष देत नाही. म्हणून हिंगोली जिल्ह्यातील गारखेडा हे गाव विक्रीला काढल्याचं ग्रामस्थांनी जाहीर केलं आहे. गावातील सर्व घरे, शेतजमिनी आणि सर्व गुरं शेतकऱ्यांनी विक्रीला काढली आहेत. आर्थिक परिस्थिती हालाखीची झाल्याने गावातील जणांनी हा निर्णय घेतला आहे. तसे निवेदन गावकऱ्यांनी प्रशासन दरबारी दिले आहे.
काय लिहिलंय या पत्रात?
हिंगोलीच्या गारखेडा ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये लिहिलं आहे की, आज तीन वर्षांपासून संपूर्ण परिसरातील शेतकरी अतिवृष्टीमुळे आत्महत्या करत आहेत. या दरम्यान सरकारने पीक विमा दिला नाही, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत अद्याप मिळाली नाही. आमचा सणासुदीचा काळ अंधारात जात आहे. त्यातच खासगी फायनान्स कंपन्यांनी आमच्या मागे पैशासाठी तगादा लावला आहे. कोरोना काळात ज्या शेतकऱ्यांचे मृत्यू झाले, त्यांना कर्जमाफी देण्यात यावी. तसेच हिंगोली जिल्हा हा आत्महत्याग्रस्त घोषित करण्यात यावा इत्यादी मागण्यांसाठी आम्ही जाहीर करतो की, आमचं संपूर्ण गाव, गुरं-ढोरांसहित, शेतजमिनींसह विकणे आहे. तरी याची तात्काळ दखल घेऊन आमची मागणी मान्य करण्यात यावी. अन्यथा आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्यावी.
गोरखेडा ग्रामस्थांनी हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या या पत्राची कॉपी ही जिल्हा पोलिस अधीक्षक आणि गारखेडा पोलिस स्टेशनलाही दिली आहे.