Hingoli Rain : हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस, ओढ्याचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने वाई बोल्डा मार्ग बंद
Hingoli Rain Update : वसमत तालुक्यातील शिरळी आश्रम शाळेजवळील ओढ्याला पूर आल्याने वाई-बोलडा हा मार्ग बंद झाल्याने अनेक गावांचा काही वेळ संपर्क तुटला होता.
Hingoli Weather Update : हिंगोली जिल्ह्यात (Hingoli Rain Update) आज सकाळपासून रिमझिम पाऊस सुरु आहे. सायंकाळच्या सुमारास मात्र या पावसाचा जोर वाढला आहे. जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी ओढ्याला पूर आला आहे. वसमत तालुक्यातील शिरळी आश्रम शाळेजवळील ओढ्याला पूर आल्याने वाई-बोलडा हा मार्ग बंद झाल्याने अनेक गावांचा काही वेळ संपर्क तुटला होता. परिणामी शहरातून गावात परतणारे कामगार ही पुराचे पाणी उतरेपर्यंत रस्त्यावरच ताटकळत बसले होते.
सेनगाव तालुक्यात मुसळधार पाऊस
हिंगोली (Hingoli) जिल्ह्यांमध्ये पावसाने धुमाकूळ पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यामध्ये मंगळवारपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सेनगाव तालुक्यातील साखरा केलसुला हिवरखेडा उटी-ब्रह्मचारी धोतरा यासह इतर गावांमध्ये या जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे या भागातील नाले-ओढे तुडुंब भरून वाहत आहे. तर या पावसाचा फटका शेतीला सुद्धा बसणार आहे. शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे काही ठिकाणी शेतातील पिकांचं नुकसान झालं आहे.
हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला
हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असून सद्यस्थितीत नद्या, नाले, ओढे भरुन वाहत आहेत. यामुळे नद्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे यांनी हे आवाहन केले आहे.
शेतातील 'या' पिकांना पावसाचा फायदा
हिंगोली जिल्ह्यात आज सकाळपासून संततधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांची कामे खोळंबली आहेत तर, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे शेतातील सुद्धा कामे खोळंबली आहेत. दिवसभर सुरू असलेला हा पाऊस काही पिकांना फायदेशीर ठरतोय. शेतातील सोयाबीन, हळद, कापूस, तूर यासह अन्य पिकांना या पावसाचा फायदा होतोय तर, ढगाळ वातावरणामुळे सकाळपासून सूर्यदर्शन सुद्धा झालं नाही.
पावसाचा लहरीपणा
यंदाच्या पावसाळ्यात निसर्गाचा चांगलाच लहरीपणा पाहायला मिळत आहे. काही भागात मुसळधार पाऊस होत आहे. तर, काही भागात अजून जमिनीची तहानच भागली नाही. महाराष्ट्रातील मराठवाड्यातील जालना आणि हिंगोली या शेजारी शेजारी असलेल्या दोन जिल्ह्यात पावसाच वेगवेगळ चित्र आहे, कुठं नदी दुथडी भरून वाहतेय तर कुठं पावसाअभावी पीक कोमेजून जात आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :