Hingoli Rain Update : हिंगोली जिल्ह्यांमध्ये सर्वदूर जोरदार पाऊस, उघडा नदीला पूर; शेतात पाणीच पाणी
Hingoli Rain Update : पाणी शेतीमध्ये शिरल्यामुळे शेतातील पिकांचे सुद्धा मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे.
Hingoli Rain Update : मुंबईसह राज्यातील अनेक भागात पावसाचे (Rain) वातावरण पाहायला मिळत असून, अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान कालपासून हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात देखील दमदार पावसाने हजेरी लावली आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये कालपासून सर्वदूर जोरदार पाऊस पडत आहे. तर हिंगोली जिल्ह्यातील तीन मंडळात अतिवृष्टी झाली आहे. तसेच वसमत शहरालगत असलेल्या उघडा नदीला पूर आला आहे. पुरातील पाणी नदीपात्र ओलांडून जवळपासच्या शेतीमध्ये शिरले आहे. पाणी शेतीमध्ये शिरल्यामुळे शेतातील पिकांचे सुद्धा मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. हळद, सोयाबीन, ऊस, कापूस या पिकांना पुराच्या पाण्याचा फटका बसतोय. नदीच्या बाजूला असलेल्या वीट उद्योगांना सुद्धा पुराचा फटका बसलाय. तर या परिसरात सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे.
मागील 24 तासात सरासरी 32.70 मिमी पावसाची नोंद
हिंगोली जिल्ह्यात आज (21 जुलै) रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 32.70 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 277 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 34.83 टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज दिनांक 21 जुलै रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात कंसांत दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत. हिंगोली 13.80 (326.20) मि.मी., कळमनुरी 40.60 (279.70) मि.मी., वसमत 48.60 (270.80) मि.मी., औंढा नागनाथ 56.10 (282.70) मि.मी, सेनगांव 12.90 (222.40) मि.मी पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 277 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असून सद्यस्थितीत नद्या, नाले, ओढे भरून वाहत आहेत. यामुळे नद्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे यांनी दिला. तर नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना दिलासा
जून महिना कोरडा गेल्यावर शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. दरम्यान जुलै महिन्याचे 15 दिवस देखील पाऊस झाला नाही. मात्र मागील तीन चार दिवसांपासून पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर पिकांना देखील जीवनदान मिळाले आहे. अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता होती, मात्र आठवडाभरापासून सुरु असलेल्या कमी अधिक पावसामुळे दुबार पेरणीचे संकट टळले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: