एकनाथ शिंदेंचा आणखी एक खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, नाशिकमधून उमेदवारी न मिळाल्यास हेमंत गोडसे टोकाचा निर्णय घेणार?
Hemant Godse : खासदार हेमंत गोडसेंची तीन माणसं भेटायला आल्याचा गौप्यस्फोट शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी केला आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा महायुतीत (Mahayuti Seat Sharing) कायम आहे. या जागेवर शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी छगन भुजबळांना मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे हेमंत गोडसे यांनी मुंबईत गाठत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhkar Badgujar) यांनी खळबळजनक दावा केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आले होते. त्यानंतर नाशिकच्या जागेवर छगन भुजबळांचे नाव चर्चेत आले. भाजपने नाशिकच्या जागेसाठी आग्रही मागणी केली. आता बडगुजरांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
सुधाकर बडगुजरांचा मोठा गौप्यस्फोट
नाशिकच्या सिन्नर मधील ठाकरे गटाच्या संवाद मेळाव्यात जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'हेमंत गोडसेंचे तिन माणसे माझ्याकडे येऊन गेली. आम्हाला पदरात घ्या म्हटले पण मी त्यांना सांगितलं गद्दारांना माफी नाही, आता वेळ निघून गेली तुम्ही तुमच्या पक्षात परत जा आणि समोरून लढा, असे वक्तव्य सुधाकर बडगुजर यांनी केले आहे. महायुतीकडून नाशिकच्या जागेचा तिढा कायम असतांनाच बडगुजरांचे वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे. हेमंत गोडसे टोकाचे पाऊल उचलणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकच्या जागेसाठी आग्रही
दरम्यान, हेमंत गोडसे यांनी आज पुन्हा एकदा हेमंत गोडसेंची भेट घेतली. नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेलाच मिळावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. नाशिक ही शिवसेनेची पारंपारिक जागा आहे. त्यामुळे नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळावी यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही असल्याचे हेमंत गोडसे यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे सुधाकर बडगुजर यांनी हेमंत गोडसेंबाबत मोठा गौप्यस्फोट केल्याने हेमंत गोडसे नक्की काय निर्णय घेणार? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा