Independence Day 2023 : फक्त "या" लोकांनाच त्यांच्या गाडीवर तिरंगा लावण्याचा आहे अधिकार ; कोण आहेत "ही" खास लोक?
अनेक लोक गाडीवरती देशभक्तीच्या भावनेनं तिरंगा लावतात. आपण देखील अनेक गाड्यांवर ध्वज लावलेले पाहतो. राष्ट्रध्वज लावण्याचा अधिकार ठराविक विशेष व्यक्तींनाच आहे आणि तो वाहनावर कुठेही लावून चालत नाही.
Independence Day 2023 : देशाचा अभिमान प्रत्येकाला असतो. भारतीयांनाही आपल्या देशाचा आणि राष्ट्रध्वजाचा अभिमान आहे. मात्र या अभिमानामध्ये कधी कधी आपल्याकडून तिरंग्याचा अपमान होतो. उद्या भारताचा 77 वा स्वातंत्र्यदिन आहे. या स्वातंत्र्यदिनाची मोठी तयारी गेली कित्येक दिवसापासून पाहायला मिळत आहे. रस्त्यावर, चौकाचौकात आणि बाजारात आपला राष्ट्रध्वज विकताना लोक दिसत आहे. अनेक लोक गाडीमध्ये देशभक्तीच्या भावनेनं तिरंगा लावतात. आपण देखील अनेक गाड्यांवर ध्वज लावलेले पाहतो. मात्र, राष्ट्रध्वज लावण्याचा अधिकार ठराविक विशेष व्यक्तींनाच आहे आणि तो वाहनावर कुठेही लावून चालत नाही. या लोकांशिवाय जर कोणी त्यांच्या गाडीवर तिरंगा ध्वज लावला तर ते बेकायदेशीर ठरेल. चला जाणून घेऊया कोण आहेत हे खास लोक.
गाडीवर तिरंगा कोण लावू शकेल?
भारतीय ध्वज संहिता 2002 च्या कलम 11 नुसार, केवळ या विशेष लोकांना त्यांच्या वाहनांवर राष्ट्रध्वज प्रदर्शित करण्याचा अधिकार आहे. यामध्ये समाविष्ट झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत
देशाचे राष्ट्रपती
उपराष्ट्रपती
राज्यपाल व नायब राज्यपाल
पंतप्रधान व इतर कॅबिनेट मंत्री
केंद्रातील राज्यमंत्री व उपमंत्री
लोकसभेचे सभापती
राज्यसेभचे उपसभापती
लोकसभेचे उपसभापती
राज्याचे किंवा संघराज्य प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि इतर कॅबिनेट मंत्री
राज्याचे किंवा संघराज्य प्रदेशातील राज्यमंत्री
राज्यांच्या विधानपरिषदांचे अध्यक्ष
राज्यांच्या आणि संघराज्य प्रदेशांच्या विधानसभांचे सभापती
राज्यांच्या विधानपरिषदांचे उपाध्यक्ष
राज्यांच्या आणि संघराज्य प्रदेशांच्या विधानसभांचे उपसभापती
भारताचे सरन्यायधीश
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश
उच्च न्यायालयांचे न्यायाधीश
राष्ट्रध्वज वाहनाच्या कोणत्या बाजूने लावावा?
भारत सरकारने दिलेल्या वाहनातून परदेशी सन्माननीय अधिकारी जात असतील, त्यावेळी राष्ट्रीय ध्वज कारच्या उजव्या बाजूला लावला जाईल व परदेशाचा ध्वज कारच्या डाव्या बाजूला लावण्यात येईल.
ध्वजाचा अपमान झाल्यावर कोणती शिक्षा?
ज्या व्यक्तींना झेंडा लावण्याची परवानगी नाही म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीने गाडीवर झेंडा लावल्यास त्यावर कारवाई होऊ शकते. शिवाय झेंडe जाळला, पायदळी तुडवला किंवा कुठेही फेकला तर राष्ट्रीय अभिमानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, 1971 अंतर्गत त्या व्यक्तीला 3 वर्षांपर्यंत जेल किंवा दंडात्मक शिक्षा केली जाऊ शकते.
काय आहेत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश?
2004 मधील जिंदाल प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टानं महत्त्वपूर्ण आदेश दिले होते. या आदेशानुसार प्रत्येक भारतीयाला तिरंगा फडकविण्याचा अधिकार आहे. मात्र गाडीवर तिरंगा लावण्याचा अधिकार सगळ्यांना देण्यात आलेला नाही. फार कमी मान्यवरांना दिला आहे. 2004 पूर्वी सरकारी विभाग, कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांवर तिरंगा लावण्याची परवानगी होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर प्रत्येक भारतीयाला तिरंगा फडकविण्याची परवानगी मिळाली. मात्र अजूनही सर्वसामान्य व्यक्ती आपल्या गाडीवर तिरंगा लावू शकत नाही.
इतर महत्वाच्या बातम्या