(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gulzar : ज्येष्ठ कवी गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर!
Jnanpith Award 2023 : 58 व्या ज्ञानपीठ पुरस्कारांची घोषणा झाली असून ज्येष्ठ उर्दू कवी गुलजार (Gulzar) आणि संस्कृत भाषेचे अभ्यासक जगद्गुरु रामभद्राचार्य (Jagadguru Ramanandacharya) यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे.
Jnanpith Award 2023 : ज्ञानपीठ पुरस्कार (Gyanpith Award) हा भारतीय साहित्यजगतात नोबेल पुरस्काराइतकाच सर्वश्रेष्ठ पुरस्कार समजला जातो. 58 व्या ज्ञानपीठ पुरस्कारांची घोषणा झाली असून प्रसिद्ध ज्येष्ठ कवी, चित्रपट निर्माते गुलजार (Gulzar) आणि संस्कृत भाषेचे अभ्यासक जगद्गुरु रामभद्राचार्य (Jagadguru Ramanandacharya) यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. 58 व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी या दोघांची निवड झाली आहे.
गुलजार यांनी अनेक सिनेमांतील गाणी लिहिली आहेत. गाणी लिहिण्यासह गझल आणि कवितादेखील त्यांनी लिहिल्या आहेत. तसेच जगद्गुरु रामभद्राचार्य हे संस्कृत भाषा आणि वेद आणि पुराणांचे महान अभ्यासक आहेत.
The 58th Jnanpith Award for the year 2023 has been awarded to Jagadguru Swami Rambhadracharya for Sanskrit and Shri Gulzar for Urdu
— ANI (@ANI) February 17, 2024
(File Pic) pic.twitter.com/6VCDNwbwnQ
ज्ञानपीठ समितीने एका निवेदनात म्हटले आहे की, ज्ञानपीठ हा पुरस्कार (2023 साठी) दोन भाषांमधील प्रख्यात लेखक, संस्कृत साहित्यिक जगद्गुरू रामभद्राचार्य आणि प्रसिद्ध उर्दू साहित्यिक गुलजार यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोव्यातील लेखक दामोदर मौजो यांना 2022 चा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला होता. गुलजार आणि जगद्गुरु रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्याने चाहत्यांना आनंद झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपला आनंद व्यक्त करत आहेत.
गुलजार कोण आहेत? (Who is Gulzar)
गुलजार यांचं खरं नाव संपूर्णसिंह कालरा असं आहे. भारतातील एक कवी, गीतकार आणि सिनेदिग्दर्शक, निर्माते अशी त्यांची ओळख आहे. लहानपणापासून त्यांना शास्त्रीय संगीताची आवड निर्माण झाली. विशिष्ट शब्दशैलीसाठी ते ओळखले जातात. आनंद, ओंकारा, खामोशी, थोडीसी बेवफाई, दो दूनी चार, बंटी और बबली, सफर अशा अनेक सिनेमांतील गीते त्यांनी लिहिली आहेत. 'धुआँ' या कथासंग्रहासाठी 2002 मध्ये त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. 2004 मध्ये पद्मभूषण तर 2013 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे.
जगद्गुरु रामभद्राचार्य यांच्याबद्दल जाणून घ्या.. (Who is Jagadguru Ramanandacharya)
जगद्गुरु रामभद्राचार्य हे प्रख्यात विद्वान, शिक्षणतज्ज्ञ, बहुभाषाविद्, रचनाकार, प्रवचनकार, तत्त्वज्ञ व हिंदू धर्मगुरू आहेत. रामभद्राचार्य यांनी 100 पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. 22 भाषांचे त्यांना ज्ञान आहे. जगद्गुरू रामभद्राचार्य यांनाही पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले आहे. जगद्गुरू रामभद्राचार्य यांना भारत सरकारने 2015 मध्ये पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.
संबंधित बातम्या