Gondia Crime : युवकाची निर्घृण हत्या करणाऱ्या तिघा बापलेकांना पोलिसांनी केली अटक; उधारीच्या पैशातून केली होती हत्या
Gondia Crime : गोंदिया शहरालगत असलेल्या कुडवा येथे किरकोळ उधारीच्या पैशातून झालेल्या हत्येमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली होती, या प्रकरणी पोलिसांनी तिघा बापलेकांसह अन्य एकाला अटक केली आहे.
गोंदिया : चहाटपरीवरील उधारीच्या पैशातून एकाची निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गोंदिया शहरालगत (Gondia Crime News) असलेल्या कुडवा येथे उघडकीस आला. किरकोळ वादातून झालेल्या या हत्येमुळे संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात (Gondia News) एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघा बापलेकासह अन्य एकाला ताब्यात घेतले आहे. शनिवार, 6 जानेवारीला रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
महिनाभरात खूनाची ही दुसरी घटना
या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि घडलेल्या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत आरोपींचा शोध सुरू केला. कुडवा परिसरात मागील महिनाभरात खूनाची ही दुसरी घटना असल्याने पोलिसांमध्ये देखील खळबळ उडाली होती. दरम्यान पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत अवघ्या काही तासांत आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली आहे. संतोष मानकर, लोकेश मानकर, पवन मानकर, मोहित शेंडे आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.
उधारीच्या पैशाचा वाद विकोपाला
गोंदिया शहरालगत असलेल्या कुडवा येथे या प्रकरणातील आरोपी असलेल्या संतोष मानकर यांचे चहा नाश्त्याचे दुकान आहे. तर मृतक ईश्वर उर्फ मनीष भालाधरे हा या दुकानात कायम चहा नाश्त्यासाठी येत होता. दरम्यान मृतक ईश्वरची उधारीही येथे चालत होती. गेल्या काही महिन्यापासून या दोघांमध्ये उधरीच्या पैश्यांवरून वाद निर्माण झाला होता. अनेकवेळा या दोघांमध्ये यांच पैशावरुन शाब्दिक चकमक देखील झाली होती. जेव्हा संतोष मानकर त्याला पैसे मागायचा तेव्हा ईश्वर उर्फ मनीष त्याला धमकी देत होता.
हाच वाद विकोपाला गेल्याने ही हत्या करण्यात आली. रागाच्या भरात आरोपी संतोष आणि त्याच्या दोन्ही मुलांसह अन्य दोन आरोपींनी मृतकावर कुऱ्हाडीने हल्ला करत निर्घृण हत्या केली. या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली असता रामनगर पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीना ताब्यात घेतले आहे. रामनगर पोलिसांनी या गुन्ह्यात आरोपी विरुद्ध भादंवि कलम 302, 323, 143, 147, 148, 149, 504 अंतर्गत गुन्हा नोंद केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू बस्तवाडे करत आहेत.