Gadchiroli Naxal News : मोठी बातमी! 36 लाखांचे बक्षीस असलेल्या पाच जहाल नक्षलवाद्यांना अटक; अनेक हिंसक कारवायांमध्ये होते सक्रिय
Gadchiroli Naxal News : अनेक हिंसक कारवायांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या पाच नक्षलवाद्यांपैकी तिघांना अटक, तर दोघांना गडचिरोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Gadchiroli Naxal News : अनेक हिंसक कारवायांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या पाच नक्षलवाद्यांपैकी तिघांना अटक, तर दोघांना गडचिरोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भामरागड तालुक्यातील अबूझमाडच्या बिनागुंडा परिसरात ही कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर शासनाचे तब्बल 36 लाख रुपयाचे बक्षीस होते. त्यांच्याकडून एक स्वयंचलित एसएलआर रायफल, दोन भरमार बंदूक आणि चार रायफल असे सात हत्यार जप्त करण्यात आले आहे. उंगी होयाम ऊर्फ सुमली, पल्लवी केसा मिडीयम ऊर्फ बंडी, देवे कोसा पोडीयाम ऊर्फ सबिता असे अटक केलेल्या नक्षलवाद्यांची नावे असून इतर दोघे वयाचा ठोस पुरावा नसल्याने त्यांना ताब्यात घेतले आहे.
पाचही नक्षलवाद्यांवर होते 36 लाखांचे बक्षीस
भामरागड तालुक्यातील बिनागुंडा परिसरात गडचिरोली पोलिसांचे सी- 60 कमांडो आणि सीआरपीएफ बटालियन 37 चे जवान अभियानावर असताना गोपनीय माहितीच्या आधारे गावाला घेराबंदी करण्यात आली. तेव्हा काही नक्षल गणवेशात आणि काही साध्या वेषात संशयित व्यक्ती पोलीस पथकावर घातपात घडवण्याची योजना आखत असल्याचे समोर आले. यातील काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले. तर पाच जणांना ताब्यात घेतले. उंगी होयामवर 16 लाख, पल्लवी मिडीयमवर 08 लाख रूपयांचे तर देवे पोडीयाम 04 लाख रूपयांचे बक्षीस होते. तर इतर दोघांवर 8 लाख रुपयांचे बक्षीस असल्याची माहिती समोर आली आहे.
विविध माओवादी चकमकीत सहभागी असलेल्या जहाल माओवादी (Naxal News) ‘देवसू’सह अन्य तीन माओवाद्यांनी गोंदिया पोलिसांसमोर (Gondia Police) आत्मसर्पण केलं आहे. 2017 पासून विविध माओवादी चकमकीत सहभागी असलेल्या जहाल माओवादी देवसूवर 3.50 लाख रुपयांचे बक्षीस होतं. तर गोंदिया जिल्ह्यात 2024 पासून सक्रिय असलेल्या अन्य 3 माओवाद्यांनी ही आत्मसमर्पण करून समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या प्रभावी नक्षलविरोधी मोहिमेमुळे संजय पुनेम व देवा मुडाम या दोन माओवाद्यांनी आत्मसमर्पण (Naxal Surrender) केले होते. या साखळीत दिनांक 19 मे 2025 रोजी आणखी एका जहाल माओवादीने आत्मसमर्पण करून शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, यांचेसमक्ष 3.50 लाखाचे जाहीर बक्षीस असलेला जहाल माओवादी देवसू उर्फ देसु (मूळ नाव - देवा राजा सोडी), वय 24 वर्षे, राहणार- चीटिंगपारा/ गुंडम, पोस्ट - पामेड, पो. स्टे. तर्रेम, तालुका- उसूर, जिल्हा- बिजापूर (छ. ग.) पद - सदस्य, प्लाटून मेंबर (CC मेंबर दिपक उर्फ मिलिंद तेलतुंबडे (मृत) याचा बॉडी गार्ड ) असे नुकतेच आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्याचे नाव आहे.
याबाबत थोडक्यात वृत्त असे की, देशातील माओवादी चळवळीला प्रतिबंध व्हावा व अधिकाधिक माओवाद्यांनी आत्मसमर्पण करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता तसेच त्यांचे सामाजिक व आर्थीक पुनर्वसन व्हावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत "नक्षल आत्मसमर्पण योजना" राबविली जात आहे. माओवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्याकरीता गोंदिया जिल्ह्यात प्रभावी नक्षल विरोधी अभियान राबविण्यात येत असून विविध उपक्रम राबवून शासनाच्या कल्याणकारी योजनांची जनतेला माहिती देवून जनजागृती करण्यात येत आहे. तसेच जे माओवादी विविध भूलथापा आणि प्रलोभनांना बळी पडून माओवादी संघटनेत भरती झाले आहेत, त्यांना हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट होण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.
कोण आहे आत्मसमर्पित माओवादी देवसू?
आत्मसमर्पित माओवादी देवसू उर्फ देसु उर्फ देवा हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील गावातील रहिवासी असून त्याचे गावात नक्षल्यांचे नेहमी येणे जाणे होते. नक्षलवादी जल, जंगल, आणि जमिनीच्या लढाई खाली भोळ्या - भाबड्या आदिवासी नागरिकांना सरकार विरुद्ध भडकावून, तथाकथित व खोट्या क्रांतीचे कथन करून लोकांना नक्षल चळवळीत ओढण्याचा प्रयत्न करायचे. त्यामुळे लहानपणापासून तो नक्षल्यांच्या विविध प्रलोभन व भूलथापांना बळी पडून नक्षल विचारसरणीशी प्रभावित झाला. आणि बाल संघटनमध्ये रुजू झाला. त्यानंतर ऑक्टोंबर 2017 मध्ये पामेड पी.एल. 9 मध्ये भरती झाला आणि शासनाविरुद्ध शस्त्र हाती घेतले.
मिलिंद तेलतुंबडे अंगरक्षक म्हणून नेमणूक
दरम्यान, डिसेंबर 2017 मध्ये त्याला इतर काही नवीन भरती झालेल्या माओवाद्यांसह एम. एम. सी. झोन मध्ये पाठविण्यात आले. एप्रिल 2018 मध्ये तो आपल्या साथीदारांसह एम. सी. सी. झोन (विस्तार एरिया) मध्ये आला. तिथे दरेकसा, तांडा, मलाजखंड, पी.एल 3 या नक्षल दलम सोबत 8-15 दिवस काम केल्यानंतर त्यास तत्कालीन एम. एम. सी. झोन प्रभारी मिलिंद उर्फ दीपक तेलतुंबडे (सेंट्रल कमिटी मेंबर / सद्या मृत) याचे अंगरक्षक म्हणून नेमण्यात आले होते. दिनांक 13 नोव्हेंबर 2021 रोजी मर्दिनटोला, जिल्हा- गडचिरोली येथे नक्षलवादी आणि पोलीस यांच्यात झालेल्या चकमकीत मिलिंद तेलतुंबडे याचेसह एकूण 28 नक्षलवादी मारले गेलेत. सदर चकमकीतून माओवादी देवसु व त्याचे काही साथीदार जीव वाचवून पळून गेले. तेथून माड एरियामध्ये काम केले. त्यानंतर परत पामेड पी एल 9 मध्ये मध्ये काम केले आहे. माओवादी देवसू उर्फ देसू उर्फ देवा याने सन 2017-2022 मध्ये माओवादी संघटनेत कार्यरत असताना गोंदिया जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात घडलेल्या विविध गुन्ह्यात सहभागी असल्याचे कबूल केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या


















