नाशिकच्या जागेवर नवा ट्विस्ट! गोडसे-भुजबळांच्या रस्सीखेचीत उमेदवारी तिसराच पटकावणार? भाजपचे संकटमोचक शांतीगिरी महाराजांची भेट घेणार
Nashik Loksabha : नाशिक लोकसभा मतदारसंघावरून छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. आता गिरीश महाजन शांतीगिरी महाराजांची भेट घेणार आहेत.
Girish Mahajan : नाशिक लोकसभा मतदारसंघावर (Nashik Lok Sabha Constituency) शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र महायुतीत अद्याप या जागेचा तिढा कायम आहे. नाशिकवर शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपकडून दावा करण्यात आला आहे. एकीकडे नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना उमेदवारी जाहीर न होताच त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.
तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी उमेदवारी मिळण्याचे संकेत दिले आहेत. आता नाशिकच्या जागेवर आणखी नवा ट्विस्ट आला आहे. गोडसे-भुजबळांची रस्सीखेच सुरु असतानाच भाजप संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) हे शांतीगिरी महाराजांची भेट घेणार आहेत.
कुंभमेळ्यापासून मी शांतीगिरी महाराजांचा अनुयायी
शांतीगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उमेदवार देणार असल्याचं सांगितल्यानंतर नाशिकच्या जागेवर त्यांनी दावा केलेला आहे. यावर गिरीश महाजन हे शांतिगिरी महाराजांना भेटणार असून नाशिकमधलं तिकीट वाटप अजून ठरलेलं नाही. शांतीगिरी महाराज हे आमच्या विचारांचे असून कुंभमेळ्यापासून मी त्यांचा अनुयायी आहे. त्यांच्या मोठा जनाधार आहे. आम्ही लवकरच त्यांना भेटणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
नाशिकच्या जागावाटपावर काय म्हणाले गिरीश महाजन?
नाशिकच्या जागावाटपाबाबत गिरीश महाजन म्हणाले की, हेमंत गोडसेंनी प्रचार करणे ही चांगली गोष्ट असून त्यांना तिकीट मिळाले तर त्यांना कामात आणि त्यांना तिकीट नाही मिळाले तर आमच्या मित्र पक्षांना त्याचा फायदा होणार आहे. शेवटी आम्ही सर्व एकत्र असून नाशिकमध्ये आमचे 3 आमदार आणि महानगरपालिकेत आमचे 69 नगरसेवक आहे. नाशिकमध्ये असलेले 3 आमदार हे शंभर टक्के भाजपाचेच आहेत. यामुळे त्यांचा उपयोग आम्हाला होणार आहे. आमचा उपयोग त्यांना होणार कोणी काहीही प्रचार केला तरी तिकीट मिळाल्यावर आम्ही सर्व एकत्रितपणे काम करणार असल्याचे गिरीश महाजनांनी म्हटले आहे.
95 टक्के जागा वाटपाचा तिढा सुटला
राज्यातील जागावाटपावर गिरीश महाजन म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक जागांवर भाजप आणि शिंदे गट हे आपापले दावे करत आहेत. भाजपचं पार्लमेंटरी बोर्ड हे जागा निश्चित करणार असून 95 टक्के जागा वाटपाचा तिढा सुटलेला आहे. जागा वाटपाचा तिढा येत्या 2 दिवसात सुटणार असून उमेदवाराची आणि पक्षाची यादी लवकरच आपल्यासमोर येणार आहे.
कुणाल पाटलांनी आमची काळजी करण्याची गरज नाही
भाजपसोबत असलेल्या घटक पक्षांमध्ये अनेक वाद असून अनेक ठिकाणी उमेदवार बदलण्याची नामुष्की भाजपवर आली असल्याची टीका काँग्रेस नेते यांनी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी केली होती. यावर गिरीश महाजन म्हणाले की, कुणाल पाटलांनी आमची काळजी करायची गरज नसून त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम व्यवस्थितपणे करावं. काँग्रेसची जागा कशी निवडून येईल याचा विचार कुणाल पाटलांनी करावा. कुणाल पाटलांनी भाजपच्या भानगडी बघण्यापेक्षा त्यांच्याच पक्षातील भानगडी पाहाव्या अशी खोचक टीका त्यांनी यावेळी केली.
आणखी वाचा
नाशिकच्या उमेदवारी आधीच मराठा समाजाकडून विरोध, छगन भुजबळ म्हणाले, मी मराठ्यांना विरोध केलाच नाही!