(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gadchiroli News : धक्कादायक! धावत्या एसटीने घेतला अचानक पेट; बसचालकाच्या प्रसंगावधानाने वाचले प्रवाशांचे प्राण
Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यातील घोट-मुलचेरा महामार्गावर एका धावत्या बसने अचानक पेट घेतला. मात्र बसचालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.
Gadchiroli News गडचिरोली :गडचिरोली जिल्ह्यातील घोट-मुलचेरा महामार्गांवर येथे एका धावत्या बसने (ST) अचानक पेट (Fire) घेतला. मात्र बसचालकाने प्रसंगावधान राखात वेळीच बस (ST) थांबवून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. ही खळबळजनक घटना आज 1 मार्चला सकाळच्या सुमारास गडचिरोलीत (Gadchiroli News) जिल्ह्यातील मुलचेरा ते घोट रस्त्यावर लागणाऱ्या जंगलात घडली. अचानक एसटीने पेट घेतल्याने प्रवाशांची भर जंगलात मोठी तारांबळ उडाली. या घटनेमध्ये सर्व प्रवासी सुखरूप असले तरी अचानक लागलेल्या या आगीच्या घटनेने प्रवासी चांगलेच भयभीत झाल्याचे बघायला मिळाले.
बसचालकाच्या प्रसंगावधानाने वाचले प्रवाशांचे प्राण
मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली आगाराची बस मुलचेरा तालुका मुख्यालयात दररोज रात्री मुक्कामी असते आणि ती बस दररोज पहाटे 6 वाजताच्या सुमारास मुलचेरा वरून घोट-चामोर्शी-भाडभिडी मार्गे गडचिरोलीला जाते. त्यानुसार शुक्रवार एम एच-07 सी-9316 क्रमांकाची एसटी बस नेहमीप्रमाणे आज पहाटे 6 वाजता प्रवाश्यांना घेऊन गडचिरोलीकडे निघाली होती. दरम्यान, घोट पासून 3 किलोमीटर जंगलात बस आली असता बसने अचानक पेट घेतल्याचे बसचालकाच्या लक्षात आले. त्यानंतर बसचालकाने प्रसंगावधान राखात वेळीच बस थांबवून सर्व प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढले. यात जवळपास 8 प्रवासी आणि चालक-वाहक असल्याची माहिती पुढे आली असून हे सर्व या अपघातात थोडक्यात बचावले आहेत.
शार्ट सर्कीटने आग लागल्याचा अंदाज
प्राथमिक अंदाजानुसार एसटी बसच्या इंजिनमधून अचानक धूर निघत असल्याने बसच्या बॅटरीमध्ये शार्ट सर्कीटने ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र बसचालक प्रदीप मडावी आणि वाहक लोकेश भांडेकर यांनी प्रसंगावधान साधून सर्व प्रवाश्यांना खाली उतरवले आणि स्वतःही इतर प्रवाश्यांचे सामान घेऊन खाली उतरले. त्यानंतर लगेच बसने पेट घेतला. या बस मधील प्रवासी घाबरलेल्या अवस्थेत जंगलाच्या दिशेने जाऊन दूर उभे झाले. तर चालक आणि वाहकाने झाडांच्या फांद्या हातात घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र या निमित्याने जिल्ह्यातील एसटी बससेवेचे विदारक चित्र समोर आले आहे.
जिल्ह्याला नवीन 40 बसेस केवळ कागदावरच
राज्यात आणि विशेषता गडचिरोली सारख्या दुर्गम भागात दिवसेंदिवस एसटी महामंडळाच्या बसेसची दुरावस्था आणि त्यातून होणारे अपघातांच्या घटना समोर येत आहे. जिल्ह्यातील गडचिरोली आणि अहेरी आगारात भंगार बसेस असल्याचे चित्र आपण अनेकदा बघतील आहे. यात कधी बसचे छप्पर निघाल्या बसमध्ये प्रवाश्यांना प्रवास करावा लागतो. तर कधी एका हातात स्टेरिंग आणि एक हातात वायपर पकडून बसचालकाला बस चलवावी लागते. अशातच आता बसला आग लागल्याची घटना घडली आहे.
अनेक बसेसची दुरावस्था असताना त्या बस दुरुस्त करणे अथवा त्या एवजी नव्या बस प्रवासासाठी वापरणे अपेक्षित आहे. मात्र तसे न होता त्याच त्या बस वापरण्यात येत असल्याने मोठा अपघात होऊन प्रवाशांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता अधिक बळावली आहे. विशेष बाब म्हणजे जिल्ह्यात नवीन 40 बसेस मंजूर झाल्या असतांना देखील अद्याप या बसची प्रवाशी वाट पाहत आहेत. त्यामुळे मंजूर झालेल्या बस प्रत्यक्ष बस आगारात कधी दाखल होतील याकडे सऱ्यांचे लक्ष लागले आहे. या दुर्घटनेमुळे आता जिल्ह्यातील सर्व बसेस लवकरात लवकर बदलून नवीन बसेस आणाव्यात, अशी मागणी मागणी प्रवाश्यांच्या वतीने जोर धरू लागली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या