Gadchiroli Police: गडचिरोलीत पोलीस भरतीचा उत्साह; 508 जागांसाठी 25 हजारांपेक्षा जास्त अर्ज, महिला उमेदवारही मोठ्या संख्येनं सहभागी
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात पोलीस (Gadchiroli Police News) भरतीला उत्साही सुरुवात झाली आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 508 पोलीस शिपाई आणि चालक पदांसाठी एकूण 25 हजारावर उमेदवारांचे अर्ज आले आहेत.
Gadchiroli Police: नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात पोलीस (Gadchiroli Police News) भरतीला उत्साही सुरुवात झाली आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 508 पोलीस शिपाई आणि चालक पदांसाठी एकूण 25 हजारावर उमेदवारांचे अर्ज आले आहेत. गडचिरोली पोलीस दलात भरतीसाठी याच जिल्ह्यातील रहिवासी असणे आहे आवश्यक आहे. त्यामुळं संपूर्णपणे मानवी हस्तक्षेप टाळून तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत भरती प्रक्रिया सुरू आहे. शासनाने जारी केलेले सर्व समानांतर आरक्षण प्रक्रियेचे पालन या भरतीदरम्यान करण्यात येत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण 508 रिक्त पदांसाठी ही भरती होत आहे. यात 160 चालक शिपाई पदे तर 348 पोलीस शिपाई पदांचा समावेश आहे. वीस हजार उमेदवार शिपाई पदासाठी पात्र ठरले असून यात पाच हजार महिला आहेत तर चालक शिपाई पदासाठी 5000 उमेदवार असून यात 266 महिलांचा समावेश आहे. संपूर्ण भरती दरम्यान शारीरिक क्षमता मोजण्यासाठी मानवी हस्तक्षेप टाळून तंत्रज्ञानाचा वापर करत पारदर्शक भरती प्रक्रिया राबविली जात आहे.
शासनाने घालून दिलेल्या समानांतर आरक्षणानुसार संपूर्ण प्रक्रियेचे काटेकोर नियोजन केले जात आहे. 2018 पासून शासनाने निर्णय केल्याप्रमाणे केवळ गडचिरोली जिल्ह्यातील उमेदवारच या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत. गडचिरोली पोलीस मुख्यालयात पोलीस दलाच्या वतीने यासाठी मोठी यंत्रणा राबविली जात आहे.
एका दिवसात पोलीस मदत केंद्राची उभारणी
नक्षलदृष्ट्या अतिसंवेदशील असलेला गडचिरोली जिल्हा, दुर्गम अतिदुर्गम भाग असलेला ज्या ठिकाणी बरेच आदिवासी बांधव आज देखील विकासापासून कोसो दूर आहेत. त्यांचा विकास व्हावा व नक्षल कारवायांना आळा बसावा यासाठी गडचिरोली पोलिस दलाने उपविभाग भामरागड अंतर्गत मन्नेराजाराम या ठिकाणी नवीन पोलिस मदत केंद्राची स्थापना केली आहे.
या पोलिस मदत केंद्राची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलिस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यात 15000 मनुष्यबळ , 10 जेसीबी,10 ट्रेलर, 3 पोकलेन, 40 ट्रक सह इतर यंत्रसामुग्रीच्या सहायाने अवघ्या एका दिवसात पोस्ट उभारणी करण्यात आली. या पोस्टमध्ये वायफाय सुविधा, 20 पोर्टा कॅबिन, टॉयलेट सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅक वॉल इत्यादींची उभारणी करण्यात आली आहे. पोस्ट सुरक्षेसाठी गडचिरोली पोलिस दलाचे 3 अधिकारी व 46 अमलदार, एसआरपीफचे 2 अधिकारी व 50 अमलदार तसेच सीआरपीएफचे एक असिस्टंट कमांडंट, 4 अधिकारी व 60 अमलदार तैनात करण्यात आले आहेत. डीआयजी संदीप पाटील आणि पोलीस अधीक्षक निलोत्पल हे या ठिकाणी राहून संपूर्ण कामाचा आढावा घेत होते.