Gadchiroli: गडचिरोलीत अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनीवर दोन युवकांचा बलात्कार
एटापल्ली तालुक्यातील रहिवासी असलेली पीडित मुलगी आलापल्ली येथील एका नामांकित शाळेत दहावीला होती. नुकताच दहावीचा निकाल लागल्याने रिझल्ट घेण्यासाठी ती शनिवारी शाळेत गेली होती.
गडचिरोली: दहावी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र घेण्यासाठी शाळेत गेलेल्या एका अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनीवर दोन युवकांनी मिळून अत्याचार केल्याची घटना अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे शनिवारी घडली. याप्रकरणी अहेरी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. रोशन गोडसेलवार (23 रा. आलापल्ली) आणि निहाल कुंभारे (२३) अशी आरोपींची नावे आहे.
एटापल्ली तालुक्यातील रहिवासी असलेली पीडित मुलगी आलापल्ली येथील एका नामांकित शाळेत दहावीला होती. नुकताच दहावीचा निकाल लागल्याने रिझल्ट घेण्यासाठी ती शनिवारी शाळेत गेली होती. त्यानंतर तिची तब्येत बरी वाटत नसल्याने तिचा ओळखीचा मित्र निहाल याने त्याचा मित्र रोशन याच्या खोलीवर नेले.संध्याकाळी दोन्ही आरोपींनी मुलीला बळजबरीने मद्य पाजून तिच्यावर अतिप्रसंग केला व आलापल्ली येथील चौकात सोडून दिले. घाबरलेली मुलगी एटापल्ली आपल्या गावी गेली आणि कुटुंबीयांना आपबिती सांगितली.
पोस्को कायदाअंतर्गत गुन्हा दाखल
कुटुंबीयांनी पीडित मुलीसमवेत अहेरी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. अहेरी पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवून घेत प्रकरणाची चौकशी सुरू केली. आरोपींवर भा.द.वी. 376 ,पोस्को कायदाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांची घटनेचे गांभीर्य बघत तत्परता दाखवत तपासाचा चक्र फिरवला आणि तासभरातच आरोपीला अटक केली. अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी संपूर्ण घटनेची सूत्र आपल्या हाती घेऊन तापास सुरू केला आहे. अहेरी पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा आरोपींना अटक करून त्यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यासह बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.