Devendra Fadnavis : बाहेरचे लोक नेऊन बारसूमध्ये आंदोलन; स्थानिकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय पोळी भाजली जातेय : देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis : "बाहेरचे लोक नेऊन बारसूमध्ये आंदोलन सुरु आहे. राज्याची, सरकारची बदनामी करण्याचा काहींचा प्रयत्न असून स्थानिकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय पोळी भाजली जातेय," असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Devendra Fadnavis : "बाहेरचे लोक नेऊन बारसूमध्ये आंदोलन सुरु आहे. राज्याची, सरकारची बदनामी करण्याचा काहींचा प्रयत्न असून स्थानिकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय पोळी भाजली जातेय," असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. तसंच महाविकास आघाडीची कालची सभा निराश लोकांचा अरण्य रोदन आहे. त्यांची सत्ता गेल्याने ते निराश आहेत, बावचळलेले आहे, त्यांचा तोल गेला आहे. त्यांच्या बोलण्याला गांभीर्याने घ्यायची गरज नाही, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी वज्रमूठ सभेवर (Vajramuth Rally) टीका केली आहे. गडचिरोलीमध्ये (Gadchiroli) बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा, बारसू रिफायनरी आंदोलनासह विविध विषयांवर भाष्य केलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "अडीच वर्ष सत्तेत असताना एकही विकासाचे काम त्यांनी केलेले नाही. आम्ही मात्र काम करतो आहे. मविआच्या घोषणापत्रात एक रुपया क्लिनिकची घोषणा करण्यात आली होती. मात्र अडीच वर्षात एकही क्लिनिक यांनी सुरु केले नाही. आम्ही काल साडेतीनशे 'बाळासाहेब ठाकरे आपला दावाखाना' सुरु केले. ते फक्त बोलणारे, तोंडाची वाफ काढणारे लोक आहेत."
बाहेरचे लोक नेऊन बारसूमध्ये आंदोलन
रत्नागिरीतील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या माती परीक्षणाला सुरुवात झाली आहे. याविरोधात बारसूमध्ये आंदोलन सुरु आहे. याविषयी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मुळात या आंदोलनाला स्थानिकांचा पाठिंबा नाही, बाहेरचे लोक नेऊन आंदोलन सुरु आहे. विरोधापेक्षा स्थानिकांचा रिफायनरीला पाठिंबा जास्त आहे. तिथे काही वाईट चित्र निर्माण करुन राज्याची, सरकारची बदनाम करण्याचा काहींचा प्रयत्न असून त्यासाठी स्थानिकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे राजकीय पोळी भाजली जात आहे. यांचा दुहेरी चेहरा समोर आला आहे." तसंच जे लोक वारंवार आंदोलनात असताता अशांना गृह विभागाने निश्चितच आयडेन्टीफाय केले आहे. आमच्याकडे असे रिपोर्ट्स आहे की जे लोक राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, त्या गटाचाही बारसूच्या आंदोलनात सहभाग असल्याचे समोर येत आहे.
जेव्हा निवडणुका होतील, तेव्हा यांना पाडून दाखवू. योग्य वेळी निवडणुका होतील आणि तेव्हा यांना चारही मुंड्या चीत करु, असा निर्धार देखील फडणवीस यांनी यावेळी बोलून दाखवला.
'...त्यांनी आम्हाला हिंदुत्त्व शिकवू नये'
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन निशाणा साधला. ते म्हणाले की, "जे लोक हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बोलण्याऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे बोलायला लागले आहेत, त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. त्यावर मी काहीच बोलणार नाही, आता यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बोलावे."
तेवढे विरोधकांचेच नुकसान
विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर होत असलेल्या टीकेलाहा देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. "विरोधी पक्षातले नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जेवढी टीका करतील तेवढे विरोधकांचे नुकसान होत राहिल. पंतप्रधानांवर वाईट टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे, सूर्यावर थुंकण्यावर थुंकी आपल्या चेहर्यावरच पडते, असे फडणवीस म्हणाले.
सलमान खानची सुरक्षा आधीच वाढवली आहे
यावेळी त्यांनी अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेवरही भाष्य केलं. "मुंबईएवढे सुरक्षित शहर देशात कोणतेही नाही, त्यामुळे सलमान खान यांची सुरक्षा आधीच कडक करण्यात आली आहे. मुंबईत कोणीही भीती बाळगण्याचे काही कारण नाही," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.