निवडणुकीच्या काळात विध्वंस घडवण्याचा कट; पोलिसांच्या चकमकीत गडचिरोलीत 5 माओवादी ठार
गडचिरोली पोलिसांचे पथक जंगल परिसरात पोहोचताच माओवाद्यांनी पोलीस पथकाच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली
गडचिरोली : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये विध्वंसक कारवाया करून घातपात घडविण्याच्या उद्देशाने मागील दोन दिवसांपासून काही माओवादी एकत्र येऊन कट रचण्याच्या तयारीत होते. गडचिरोली (Gadchiroli) महाराष्ट्र व नारायणपूर छत्तीसगड सीमेलगत असलेल्या कोपर्शी तालुका भामरागड जंगल परिसरात हे माओवादी (Naxal) दबा धरून बसल्याची गोपनीय माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाल्याने अप्पर पोलीस अधीक्षक अभियान यतिश देशमुख व अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन एम .रमेश यांचे नेतृत्वात सी 60 पथकाच्या 22 तुकड्या व सीआरपीएफ च्या QAT च्या 02 तुकड्या या कोपर्शी जंगल परिसरात मोहीम राबवत आहेत. येथील दोन वेगवेगळ्या ठिकाणी माओवाद विरोधी अभियान राबविण्याकरिता या तुकड्या रवाना करण्यात आल्या आहेत. त्यातच, आज माओवादी व जवानांमध्ये चकमक झाल्यानंतर 5 माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
गडचिरोली पोलिसांचे पथक जंगल परिसरात पोहोचताच माओवाद्यांनी पोलीस पथकाच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीस पथकाकडून माओवाद्यांना शस्त्र खाली टाकून शरण येण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु, माओवाद्यांनी शरण न येता पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार सुरू ठेवला. गोळीबाराला प्रत्युत्तर देताना पोलीस पथकाकडून दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार करावा लागला, या अभियानात 05 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश प्राप्त झाले झाले. जंगल परिसरात शोधमोहीम सुरू असून मृत माओवाद्यांची ओळख पटवण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे.
हेही वाचा
500 रुपयांचे बाँड घेऊन उमेदवार भेटीला, मनोज जरांगेचं सर्वच इच्छुकांना बाँड पेपरबाबत महत्त्वाचं आवाहन