एक्स्प्लोर
शेतकरी संपावर : किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांची सडेतोड मुलाखत
अमरावती : महाराष्ट्रातील शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत अधिक स्पष्टता आणावी, अशी मागणी केली आहे. शिवाय, शेतकरी संपात सहभागी न होण्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ते अमरावतीत एबीपी माझाशी बोलत होते.
...म्हणून शेतकरी संपात सहभागी नाही : अमर हबीब
"मी शेतकरी संपाच्या विरोधात नाही, फक्त सहभागी नाही. शेतकऱ्यांच्या बाजूला कुणीही उभं राहत असेल, तर ती आनंदाचीच बाब आहे. त्यामुळे विरोध नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या मागण्यांमधील बारकावे स्पष्ट करण्याची गरज आहे.", असे अमर हबीब म्हणाले.
सातबारा कोरा करण्याबाबत अमर हबीब यांची भूमिका काय?
"सातबारा कोरा करा, अशी शेतकरी संपातील एक प्रमुख मागणी आहे. पण कुणाचा सातबारा कोरा करा? तर ते म्हणतात, सगळ्यांचा करा. मला सगळ्यांचा सातबारा कोरा करण्यात अजिबात रस नाही. या देशात कर्मचाऱ्यांच्या जमिनी आहेत, व्यापाऱ्यांच्या जमिनी आहेत, इनकम टॅक्स भरणाऱ्यांच्या जमिनी आहेत, त्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी माझ्या मुलांनी मार खावा, असं मला अजिबात वाटत नाही.", असे अमर हबीब म्हणाले. शिवाय, "सातबारा कोरा करण्याबाबतच्या मागणीत अधिक स्पष्टता हवी. ज्यांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे, त्यांचंच कर्ज माफ करा, दुसऱ्यांचं कर्ज माफ करण्याची गरज नाही. दुसऱ्यांचं कर्ज माफ करणं म्हणजे सरकारी तिजोरीवर दरोडा घालणं आहे.", असं रोखठोक मत अमर हबीब यांनी मांडलं.
"एकूण शेतीवर 30 हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. त्याचा तुम्ही अभ्यास केला तर लक्षात येईल, 10 हजार कोटी रुपयेसुद्धा शेतीवर उपजीविका असलेल्यांवर नाहीय. त्यामुळे राहिलेले 20 हजार कोटी रुपये ज्यांची ऐपत आहे त्यांना तुम्ही फुकट वाटणार आहात. यात छुपा डाव आहे कर्मचाऱ्यांचा, त्यांनी शेतीच्या नावाने घेतलेली कर्ज माफ करुन घ्यायची आहेत.", असे अमर हबीब म्हणाले.
व्यापारी बाजारातून जाता कामा नये : अमर हबीब
मुख्यमंत्र्यांची तूर खरेदीबाबतच्या भूमिकेवर अमर हबीब यांनी सडेतोड भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, "तुरीच्या बाबतीत लोकांना अनुभव आहे. सगळा शेतीमाल जर सरकार विकत घ्यायला लागलं आणि व्यापारी या शेतीमालाच्या बाजारातून निघून गेले, तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होईल. व्यापारी एक राज्य सोडून दुसऱ्या राज्यात धंदा करायला जाऊ शकतात, शेतकऱ्याने आपला माल कुठे विकावा? अर्थशास्त्रातील साध्या-सोप्या गोष्टी मुख्यमंत्र्यांना कळत नाही आणि उगाच सांगत सुटतात, हमीभावापेक्षा कमी भाव देणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात आम्ही बिल आणणार आहोत. त्यामुळे व्यापारी बाजारातून निघून जातील आणि त्याचं नुकसान शेतकऱ्यांना भोगावं लागेल."
शेतकरीविरोधी हे तीन कायदे रद्द करा : अमर हबीब
"सिलिंग, आवश्यक वस्तू आणि जमीन अधिग्रहण, हे तीन कायदे शेतकरीविरोधी आहे. हे आणले काँग्रेसने, भाजपवाले राबवतायेत आणि या कायद्यांना सपोर्ट कुणी केला, तर डाव्यांनी. त्यामुळे या देशातील सर्वच पक्ष शेतकऱ्यांचे मारेकरी आहेत. या सगळ्यांनी शेतकऱ्यांचा घात केलेला आहे. त्यामुळे त्यांना सोबत घेऊन कुठलीही लढाई पुढे जाऊ शकत नाही.", अशी टीका अमर हबीब यांनी केली.
जातीवादी नको, अर्थवादी व्हा : अमर हबीब
"शरद जोशींनी सातत्याने असा प्रयत्न केला की, कोणत्याही जातीवादी संघटनांच्या हातामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन जाता कामा नये. महेंद्रसिंग टिकेत हे तिथल्या जातपंचायतीचे नेते होते आणि त्यांनाही सांगितलं गेलं की, अर्थशास्त्रावरच शेतकऱ्यांना एकत्र करायचं, जातीच्या आधारावर नाही. जर जातीवादी लोक हे प्रश्न हाताळत असतील, तर त्यांना बाजूला केलं पाहिजे. त्यांना म्हणायचं, तुम्ही पाठिंबा द्या, शिकून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही या. अर्थवादी होऊन या, जातीवादी होऊन आंदोलनात येण्याची गरज नाही. तर अर्थवादी लढाई होईल. शेतकऱ्यांचा प्रश्न हा व्यावसायिकांचा आहे, कुण्या एका जातीचा नाही. जातीवादी संघटनांना निर्णय प्रक्रियेत घेऊ नये. याचंही तारतम्य बाळगलं पाहिजे." - अमर हबीबअनेकजण राजकीय गरजेपोटी आंदोलनात!
'मोठी मजेची गोष्ट आहे. ऐंशीच्या दशकामध्ये ज्यावेळी खऱ्या अर्थाने शेतकरी उभा राहत होता, तेव्हा हे सगळे विरोधात होते. यांचे नेते म्हणायचे, शरद जोशींच्या पोटात सुरा घालून त्यांची आतडी बाहेर काढली पाहिजे. हे मुंबईमध्येच त्यांनी म्हटलं होतं. आणि आज शेतकऱ्याच्या बाजूने सगळेच गळा काढायला लागले आहेत. ही त्यांची राजकीय गरज आहे. हे शेतकऱ्यांच्या गरजेपोटी आलेले नाहीत. हे त्यांच्या गरजेपोटी आलेले आहेत." - अमर हबीबविदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या वतीने लढावं लागेल : अमर हबीब
"सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भ आणि मराठवाड्यात होतात. इथे आंदोलन का उभं राहत नाही? 19 मार्चला आम्ही आंदोलन केलं, तर माझं निरीक्षण असंय की, विदर्भ-मराठवाड्यात सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाला. मात्र, आजच्या शेतकरी संपाचं केंद्र दुसरीकडेच आहे. शरद जोशींच्या आंदोलनावेळी पश्चिम महाराष्ट्रात काहीच नव्हतं, आता मात्र खूप जोरात आहे आंदोलन. विदर्भ-मराठवाड्यात आंदोलनाची तीव्रता असायला हवी होती. मात्र, तीव्रता नाशिक, पुणे, अहमदनगरमध्ये दिसते. विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी जर्जर झालेला आहे. त्यामुळे त्याच्या वतीने लढावं लागेल." - अमर हबीबव्हिडीओ : अमर हबीब यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement