Dhule Lok Sabha 2024 : इम्तियाज जलील यांचे सुतोवाच, एमआयएम उतरणार धुळे लोकसभेच्या रिंगणात?
Lok Sabha Elections 2024 : इम्तियाज जलील यांनी लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात एमआयएम उतरणार असल्याचे सुतोवाच केले आहे. धुळ्यात एमआयएमची मोठी ताकद असल्याने धुळ्यातून एमआयएम लोकसभा लढवण्याची शक्यता आहे.
Dhule Lok Sabha 2024 : धुळे लोकसभा मतदार संघासोबत (Dhule Lok Sabha Constituency) महाराष्ट्राच्या 20 उमेदवारांची यादी भाजपने (BJP) जाहीर करत महाराष्ट्रात आगामी लोकसभा निवडणूकीसाठी आघाडी घेतली आहे. आता सर्वांचे लक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे सेनेच्या आघाडीकडे लागले असतानाच एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी देखील लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात एमआयएम उतरणार असल्याचे सुतोवाच केले आहे.
महाराष्ट्रात ६ जागा एमआयएम लढविणार अशी माहिती खा. जलील यांनी दिली आहे. एमआयएमची धुळे लोकसभा मतदार क्षेत्रात मोठी ताकद असल्याने एमआयएम धुळे लोकसभेच्या रिंगणात उतरणार हे आता स्पष्ट होत आहे.
धुळ्यात एमआयएमची ताकद
धुळे लोकसभा मतदार संघात काँग्रेस विरूद्ध भाजप असा सामना आजपर्यंत रंगला. मात्र भाजप आणि काँग्रेस यांना समान विरोध करीत मुस्लीम समाजाला एकत्र करून वेगळे राजकारण करणारा एमआयएम पक्ष राष्ट्रीय राजकारणासह महाराष्ट्रातही लक्षवेधी ठरला आहे. एमआयएमने मुस्लीम बहुल मतदार संघांमध्ये ताकद निर्माण केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तसेच मुंबई, भिवंडी, मालेगाव आणि त्यापाठोपाठ धुळे विधानसभा मतदार संघात एमआयएमने आपली ताकद सिद्ध केली आहे.
धुळे लोकसभेच्या रिंगणात एमआयएम?
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघात सलग दोन वेळा खासदार इम्तियाज जलील हे विजयी ठरले आहेत. छत्रपती संभाजी नगर पाठोपाठ एमआयएमची ताकद धुळे लोकसभा मतदार संघात देखील मोठ्या प्रमाणात असल्याचे बोलले जाते आहे. धुळे शहर विधानसभा आणि मालेगाव शहर विधानसभा मतदार संघ एमआयएमच्या ताब्यात आहे. धुळ्यात एमआयएमचे आमदार फारूक शाह तर मालेगावला आमदार मौलाना मुफ्ती आहेत. दोन विधानसभा क्षेत्र एमआयएमच्या प्रभावाखाली असल्याने आणि मोठी वोटबँक धुळे लोकसभा क्षेत्रात असल्याने एमआयएम नक्कीच धुळे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची चिन्ह आहेत.
इंडिया आघाडीच्या घोषणेनंतर होणार पत्ते खुले
खा. इम्तियाज जलील हे एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. ओवेसी यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू मानले जातात. महाराष्ट्राची पक्षाची सूत्रे खा. जलील यांच्याच हाती असल्याचेही सांगण्यात येते. त्यामुळे खा. जलील यांनी महाराष्ट्रात एमआयएम 6 जागा लढविणार अशी माहिती दिल्याने एमआयएम लोकसभा निवडणूकीत उतरणार हे स्पष्ट झाले आहे. सर्व पक्षांचे जागा वाटप जाहीर झाल्यानंतर आम्ही निर्णय जाहीर करू असे म्हणत खा. जलील यांनी महाविकास आघाडी अर्थात काँग्रेसची इंडिया आघाडी महाराष्ट्रातील उमेदवार घोषित केल्यानंतर आपले पत्ते एमआयएम खुले करणार अशी शक्यता व्यक्त होत आहे.
धुळ्यात होणार तगडी लढत?
धुळे लोकसभा मतदार संघात धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा तसेच मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य आणि सटाणा-बागलाण हे सहा विधानसभा मतदार संघ समाविष्ट आहेत. यात धुळे शहर आणि मालेगाव शहर येथे एमआयएमचे आमदार आहेत. त्यासोबतच उर्वरीत मतदार संघामध्ये मुस्लीम मतदात्यांची संख्या आणि कॉंग्रेस, भाजपा यांच्यावर नाराज असलेला मतदार हा एक गठ्ठा एमआयएमकडे जावू शकतो त्यामुळे एमआयएमने तगडा उमदेवार दिल्यास धुळे लोकसभा मतदार संघात भाजप विरूद्ध महाविकास आघाडी विरूद्ध एमआयएम अशी तिरंगी तगडी लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आणखी वाचा
MIM महाराष्ट्रात लोकसभेच्या 6 जागा लढवणार, मुंबईतही उमेदवार उभा करणार : इम्तियाज जलील