(Source: Poll of Polls)
Dhule Milk Adulteration: राज्यात दूध भेसळीचा कहर, उकळी आणताच चक्क रबर तयार! धक्कादायक व्हिडिओ व्हायरल
Dhule Milk Adulteration: दूध उकळल्यावर ते अक्षरशः रबरा सारखे झाल्याचे महिलेने व्हिडीओतून दाखवून दिले आहे.

Dhule Milk Adulteration: धुळे (Dhule) जिल्ह्यातील शिरपूर (Shirpur) शहरात भेसळयुक्त दुधाचा (Milk Adulteration) धक्कादायक प्रकार समोर आला असून, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या प्रकरणानंतर अन्न व औषध प्रशासन विभाग (FDA) खडबडून जागा झाला असून, संबंधित दुकानाविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
Dhule Milk Adulteration: दूध उकळल्यावर झाले रबरासारखे
शिरपूर शहरातील एका दूध विक्री दुकानातून एका महिलेने दूध खरेदी केले होते. काही तासांनंतर हे दूध खराब झाले. संशय आल्याने महिलेने दूध उकळून पाहिले असता ते अक्षरशः रबरासारखे जाड आणि चिकट झाले.
या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ तिने मोबाईलमध्ये टिपून सोशल मीडियावर शेअर केला. काही क्षणांतच हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
Dhule Milk Adulteration: स्थानिक नागरिकांकडून संताप
या प्रकरणानंतर स्थानिकांनी संबंधित दूध विक्रेत्यावर कारवाईची मागणी केली आहे. “दररोज आपण पिणारे दूध जर इतक्या प्रमाणात भेसळयुक्त असेल, तर नागरिकांच्या आरोग्याचे काय?” असा सवाल नागरिक करत आहेत. दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात दूध विक्रीत मोठी वाढ होते, आणि त्यातच भेसळयुक्त दूध विक्रीचा प्रकार उघड झाल्याने अन्न सुरक्षेविषयी गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
Dhule Milk Adulteration: एबीपी माझाच्या वृत्तानंतर प्रशासनाकडून कारवाईचे आदेश
हा व्हिडिओ एबीपी माझा वृत्तवाहिनीवर प्रसारित झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाकडून तत्काळ हालचाल सुरू करण्यात आली. विभागाचे अधिकारी किशोर बाविस्कर यांनी सांगितले की, “संबंधित दूध विक्री केंद्रावरून नमुने घेतले जाणार आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी ते पाठवले जातील. तपास अहवाल आल्यानंतर दोषी दुकानदाराविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल,” अशी माहिती दिली आहे.
Dhule Milk Adulteration: दूधाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
या घटनेनंतर जिल्हाभरात विक्री होणाऱ्या दुधाच्या गुणवत्तेबद्दल गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत. काही व्यापारी नफ्यासाठी रासायनिक घटक किंवा पावडर मिश्रण करून दूध विकत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिकांनी मात्र प्रशासनाला विनंती केली आहे की, सणासुदीच्या काळात अन्न पदार्थ आणि दुधाच्या तपासण्या नियमितपणे कराव्यात, अन्यथा भेसळीचे असे प्रकार वाढतच जातील.
Dhule Milk Adulteration: कठोर कारवाईची मागणी
शिरपूरसह संपूर्ण धुळे जिल्ह्यात हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाकडून नमुने तपासल्यानंतर दोषी सिद्ध झाल्यास संबंधित दुकानदारावर कायदेशीर कारवाई होणार आहे. आता या प्रकरणात नेमकी काय कारवाई होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा



















