Maratha Reservation : 'मनोज जरांगेंना झेड प्लस सुरक्षा द्यावी', धुळ्यात सकल मराठा समाजाची मागणी
Dhule News : धुळ्यात मनोज जरांगे यांनी झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
धुळे : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा उभारणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी सध्या केली जातेय. धुळ्यातील (Dhule) सकल मराठा समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान यावेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (Antarvali Sarati) येथे गेल्या नऊ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणास बसले होते. मराठा समाजाला सरसकट आरक्षणची मागणी मनोज जरांगेंनी केलीये.
मागील महिन्यात देखील जरांगे पाटलांनी उपोषण केलं होतं, पण त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वत:जाऊन त्यांचं उपोषण सोडवलं. त्याचवेळी जरांगे पाटलांनी सरकारला पहिलं 40 दिवसांचं अल्टिमेटम दिलं होतं. पण 40 दिवसानंतरही शासनाने कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्यामुळे पुन्हा जरांगे पाटलांनी आमरण उपोषणाची हाक दिली. त्यानंतर त्यांनी राजकारण्यांना आणि पुढाऱ्यांना गावबंदी देखील केली. पण काल सरकारचं शिष्टमंडळ अंतरवली सरटीमध्ये पोहचलं आणि जरांगेंनी त्यांचं उपोषण स्थगित केलं.या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला असू शकतो, त्यामुळे त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी सकल मराठा समाजाकडून करण्यात आलीये.
आरक्षणासाठी आंदोलकांचा आक्रमक पवित्रा
दरम्यान मनोज जरांगे यांनी दुसऱ्या टप्प्यातील आमरण उपोषण सुरु केले, त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या. राज्यातील आमदार आणि खासदारांच्या घरावर हल्ले करण्यात आले. त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. पण तरीही आंदोलन सुरु ठेवण्याच्या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम राहिले.
'चर्चा अंतरवलीच्या व्यासपीठावरच'
सरकारला जर आरक्षणावर चर्चा करायची असेल तर ती चर्चा ही अंतरवली सराटीच्या होणार असल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा अतंरवली सराटीमध्ये दाखल झालं. शिष्टमंडळासोबत चर्चा झाल्यानंतर जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला वेळ दिला. पण आता दिलेला हा वेळ शेवटचा असल्याचं देखील यावेळी जरांगे पाटलांनी सांगितलं.
त्यानंंतर मराठ्यांचा मोर्चा हा मुंबईत धडकेल आणि मुंबईची आर्थिक आणि औद्योगिक नाकेबंदी करणार असा इशारा देखील त्यांनी दिलाय. त्यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण झालेला असू शकतो, अशी भीती सध्या मराठा समाजातील बांधवांना वाटू लागली आहे. त्यामुळे त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी जोर धरु लागलीये.
हेही वाचा :